
मुजोर फेरीवाल्याने ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याच्या घटनेनंतर प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. उद्या 1 सप्टेंबर पासून सर्व ९ प्रभाग क्षेत्रांमध्ये बेकायदा फेरीवाले हटाव मोहीम राबवली जाणार आहे. त्यासाठी जादा पोलीस कुमक मागवणार असून कोणत्याही परिस्थितीत फेरीवाल्यांची दादागिरी मोडून काढा असे आदेश आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले आहेत.
येथे उगारणार बडगा
सोमवारच्या घटनेची महापौर नरेश म्हस्के आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी गंभीर दखल घेतली असून अतिक्रमणाविरोधी पथक ठाण्यात सर्वत्र उद्यापासून कारवाईचा धडका लावणार आहे. माजिवडा-मानपाडा, वर्तकनगर, लोकमान्यनगर-सावरकरनगर, वागळे, नौपाडा, कोपरी, उथळसर, कळवा, मुंब्रा, दिवा येथील अनधिकृत फेरीवाल्यांच्या मुसक्या आवळल्या जाणार असून आज त्याची रणनीतीही ठरविण्यात आली.
८ हजार हॉकर्स… फक्त 35 पोलीस
ठाणे महापालिका प्रशासनाने 2019 मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार पालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांची संख्या अंदाजे ६ हजार होती. आता ती ८ हजारांवर जाऊन पोचली आहे. फेरीवाला धोरण राबविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर काम सुरू असले तरी आतापर्यंत फक्त 250 फेरीवाल्यांना आयकार्ड देण्यात आले आहे. दरम्यान उद्यापासून सुरू होणाऱ्या फेरीवाल्यांविरूद्धच्या कारवाईसाठी जादा पोलिस बळ लागेल. त्यासाठी पोलीस आयुक्तांशी चर्चा झाली असल्याचे अतिक्रमण विरोधी पथकाचे उपायुक्त अश्विनी वाघमारे यांनी सांगितले.
स्थानिकांच्या तीन वेळा तक्रारी
कासारवडवली येथील ज्या भागात महिला अधिकारी कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला झाला तेथील स्थानिक दुकानदार व रहिवाशांनी फेरीवाल्यांच्या विरोधात तीन वेळा लेखी तक्रारी मानपाडा-माजिवडा प्रभाग समितीकडे केल्या होत्या. त्याची वेळीच दखल घेऊन फेरीवाले हटवले असते तर हा हल्ला झाला नसता, असे कासारवडवली मधील नागरिकांचे म्हणणे आहे.
आज काम बंद आंदोलन
सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या 1 सप्टेंबर रोजी एमएमआर क्षेत्रातील सर्व महापालिका व नगरपालिकांमध्ये अधिकारी व कर्मचारी काम बंद आंदोलन करणार आहेत. दरम्यान हल्लेखोराला कठोर शिक्षा करावी, अशी मागणी अधिकारी संघटनेच्या वतीने पोलिस आयुक्त जयजित सिंग यांच्याकडे केली आहे.
























































