
मुंबईतील झाडांवर कीड, बुरशी वा जीवाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाद्वारे झाडांच्या बुंध्यांना गेरू व चुन्याचे लेपन नियमितपणे केले जाते. पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱया या उपक्रमाची दखल इंग्लंडमधून प्रकाशित होणाऱया आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘एआरबी’ या त्रैमासिकाने घेतली आहे. महापालिकेकडून झाडांना केल्या जाणाऱया गेरू व चुन्याच्या लेपनासंबंधी एक विशेष संशोधनपर लेख प्रकाशित केला आहे.
मुंबईत 700 उद्यानांसह महापालिकेच्या अखत्यारितील लाखो वृक्षांची सुयोग्य काळजी घेणाऱया उद्यान विभागाच्या एका वेगळ्या कामाची दखल नुकतीच वृक्ष, झाडांची निगा व पर्यावरण संवर्धन या विषयाला वाहिलेल्या ‘एआरबी मॅग्झिन’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नियतकालिकाने घेतली आहे. या अंतर्गत झाडाच्या खोडांना-बुंध्यांना करण्यात येणाऱया गेरू व चुन्याच्या लेपनाची माहिती व त्याचे फायदे सविस्तरपणे नमूद करणारा उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांचा लेख प्रकाशित झाला आहे. या लेखामध्ये परदेशी यांनी झाडांना गेरू व चुन्याचे लेपन करण्याची पारंपरिक पद्धतीची सविस्तर माहिती दिली आहे. याबद्दल महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिकेच्या उद्यान विभागाचे अभिनंदन व कौतुक करत विभागाला शुभेच्छा दिल्या.
खोडांना गेरू, चुन्याचे लेपन का?
गेरूमध्ये अम्लीय गुणधर्म असतात, तर चुन्यामध्ये अल्कधर्मी गुणधर्म असतात. गेरू व चुना या दोन्ही बाबी झाडाच्या खोडाला योग्य प्रकारे लावल्यास अशा झाडांना कीड, जीवाणू, बुरशीपासून प्रतिबंध होण्यास मदत होते.
मुंबईत अधिक पाऊस असल्याने झाडांना बुरशी लागण्याचा धोका आहे. त्यामुळे झाडांना बुरशी लागू नये, यासाठी अम्लीय गुणधर्म असणारा गेरू हा झाडाच्या खोडाच्या खालच्या बाजूला तर त्यावर अल्कधर्मी गुणधर्म असणारा चुना लावला जातो.
झाडाच्या खोडाला खोडकिडय़ाचा प्रादुर्भाव झाल्यास त्या किडय़ांद्वारे खोड पोखरले जाऊन झाड पडण्याचा व झाडाचा मृत्यू होण्याचा संभव असतो. या दृष्टीनेदेखील झाडाच्या खोडाला गेरू, चुन्याचे लेपन दिलेले असल्यास खोडकिडय़ापासून झाडाच्या खोडाचे संरक्षण होण्यास मदत होते.
मलेशियानेही घेतली होती दखल
मलेशियातील केदाह राज्याचे राजे सुलतान सालेहऊदिन इबनी अलमरहुम सुलतान बद्लीशाह यांनी मुंबईतील वृक्षांच्या खोडांना तांबडय़ा, पांढऱया रंगाचे वैशिष्टय़पूर्ण लेपन देण्यामागची माहिती जाणून घेतली होती. त्यांनी या पद्धतीचा अवलंब करण्याचे निर्देश आपल्या अधिकाऱयांना दिले होते.




























































