‘इकोकारी’ची कमाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्लॅस्टिकचा वापर पर्यावरणाला घातक आहे हे आपण जाणतोच. ही समस्या ओळखून त्यावर मात करण्यासाठी पुण्यातील ‘इकोकारी’ या सोशल एंटरप्राईझने एक नावीन्यपूर्ण पर्याय शोधलाय. टाकाऊ प्लॅस्टिकला अपसायकल करून त्यापासून आकर्षक वस्तू तयार करण्याचा उपक्रम ‘इकोकारी’तर्फे सुरू करण्यात आला आहे. यातून पर्यावरण संरक्षणाचे उद्दिष्ट साधतानाच ग्रामीण भागातील तरुण आणि महिलांना रोजगार मिळवून दिला जात आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत म्हणजे सप्टेंबर 2020 साली ‘इकोकारी’ उपक्रमाला सुरुवात झाली. मूळचे कश्मिरी असणारे, अभ्यासासाठी महाराष्ट्रात आलेल्या नंदन भट यांची ही संकल्पना. प्लॅस्टिक प्रदूषणाच्या घातक परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे त्यांचे उद्दिष्ट होते. त्यांनी खाद्यपदार्थांच्या पॅकिंगसाठी प्लॅस्टिकचा वापर करणाऱया छोटय़ा पंपन्या तसंच प्लॅस्टिकचा कचरा उचलणाऱयांसोबत काम करणाऱया स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून ‘इकोकारी’साठी टाकाऊ प्लॅस्टिक मिळवलं. प्लॅस्टिक पिशव्या, गिफ्ट रॅपर्स, चिप्स, कुकीजची पाकिटं गोळा केली.

नंदन भट म्हणाले,  प्लॅस्टिकचा कचरा आम्ही रंगाप्रमाणे वेगळा करतो. त्याला स्वच्छ धुऊन सॅनिटाईज केले जाते. त्यानंतर प्लॅस्टिक वाळवलं जातं आणि कापून त्याच्या पट्टय़ा केल्या जातात. हातमाग आणि पारंपरिक चरखा यांचा वापर करून या पट्टय़ांपासून वस्त्रांची निर्मिती करतो. पुढे त्यापासून सुंदर, आकर्षक वस्तू तयार केल्या जातात. बॅग, फॅशन अॅक्सेसरीज, ऑफिस स्टेशनरी, फूटवेअर, होम डेकोर तयार करतो. मशीन, उष्णता, रसायनांचा जराही वापर केला जात नाही. संपूर्ण प्रक्रिया पर्यावरणपूरक असते.

पर्यावरण संरक्षणाचे उद्दिष्ट; ग्रामीण भागातील लोकांना रोजगार

‘इकोकारी’ उपक्रमामध्ये दर महिन्याला 300 ते 400 किलो प्लॅस्टिक कचऱयाचे अपसायकलिंग केले जाते. या उत्पादनांच्या निर्मितीमधून ग्रामीण कलाकारांच्या हाताला काम मिळाले आहे. ‘इकोकारी’ची उत्पादने अमेरिका, युरोपमध्येही पोहोचली आहेत.