कोस्टल रोडने ‘बाबुलनाथ’ क्रॉस केला, प्रियदर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटीखाली दोन किमीचा बोगदा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणाऱ्या कोस्टल रोडच्या कामाने वेग घेतला असून प्रियदर्शनी पार्कपासून सुरू झालेल्या कोस्टल रोडच्या बोगद्याने आता बाबुलनाथ क्रॉस केले असून तो तिलाचंद गार्डनपर्यंत पोहोचला आहे. कोस्टल रोडच्या कामातील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या दोन महाकाय बोगद्यांपैकी प्रियदर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटीपर्यंतच्या पहिल्या बोगद्याचे 1 किलोमीटरपर्यंतचे काम शनिवारी रात्री 11 वाजता पूर्ण झाले. हा बोगदा दोन किलोमीटरचा असून त्यासाठी ‘मावळा’ टनेल मशीन पावसातही वेगाने काम करत आहे. दरम्यान, येत्या जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत या संपूर्ण बोगद्याचे काम पूर्ण होणार आहे, अशी माहिती कोस्टल रोडचे प्रमुख अभियंता विजय निघोट यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि पालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणारा आणि वाहतूक काsंडीमुक्त करणाऱ्या कोस्टल रोडचे काम सध्या प्रगतिपथावर आहे.

13 हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या पालिकेच्या या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाचे 38 टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंकपर्यंतच्या 10.58 किमीच्या या कामात 2.07 किमीचे दोन महाबोगदे अत्याधुनिक ‘मावळा’ नावाच्या टनेल बोअरिंग मशीनने खोदण्यात येत आहेत. पावसाळ्यातही जमिनीत 10 ते 70 मीटर खाली हे बोगदे खोदत असताना मोठय़ा प्रमाणावर खडक फोडले जात आहेत.

3 हजार मेट्रिक टनाचा वजनदार मावळा

कोस्टल रोडचे बोगदे खोदण्यासाठी चीनमधून आणलेले देशातील सर्वात मोठे टनेल मशीन 3 हजार मेट्रिक टनाचे आहे. त्याची उंची इमारतीच्या तीन मजल्यांइतकी असून त्याची लांबी 90 मीटर आहे. रिअसेंब्ल करताना त्याचे पार्ट 30 मीटरप्रमाणे तीन प्रमुख विभागात वेगळे केले जाणार आहेत.

रिअसेंबलसाठी दोन महिने लागणार, एप्रिलपासून दुसऱ्या बोगद्याचे काम सुरू

जानेवारीच्या शेवटी पहिल्या बोगद्याचे काम पूर्ण झाल्यावर मावळ्याचे पार्ट वेगळे करून तो पुन्हा प्रियदर्शनी पार्क येथे आणला जाणार आहे. तिथून पुन्हा प्रियदर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटीपर्यंत 2 किलोमीटरचा बोगदा तयार केला जाणार आहे. त्यासाठी मावळा पुन्हा जोडून बोगद्याचे काम सुरू केले जाणार आहे. मावळ्याचे पार्ट वेगळे करून ते प्रियदर्शनीला आणण्यासाठी 60 ट्रक लागणार आहेत. मावळा रिअसेंबल करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर एप्रिल महिन्यापासून दुसऱ्या बोगद्याचे काम सुरू केले जाणार आहे. दुसरा बोगदा पूर्ण तयार करण्यासाठी साधारणपणे 8 महिने लागतील, अशी माहिती निघोट यांनी दिली.

कामगार, कर्मचाऱ्यांचे दोन डोस पूर्ण

कोस्टल रोडच्या संपूर्ण प्रकल्पात खासगी आणि सरकारी असे सुमारे 2600 कामगार, कर्मचारी असून त्या सर्वांचे कोरोना लसीचे दोन डोस पूर्ण झाले आहेत. मात्र, त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून दरदिवशी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती कोस्टल रोड प्रकल्पावरील अधिकाऱ्याने दिली.

कोरोनाचे नियम पाळून काम सुरू असल्यामुळे सध्या कोस्टल रोडचे काम थोडे मंदावले आहे. मात्र, काम अखंडित सुरू असून दुसऱ्या बोगद्याचे कामही कोरोनाचा अडथळा नसेल तर आपण वेगाने करणार आहेत. कामाचा अपेक्षित वेग गाठण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत.

विजय निघोट, प्रमुख अभियंता, कोस्टल रोड