
कोरोनामुळे दीड वर्षापासून आर्थिक झळ सोसणाऱ्य़ा मुंबईकरांना पालिकेने मालमत्ता करात मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. कोविडमुळे सलग दुसऱ्य़ा वर्षी मालमत्ता कर न वाढवता आहे त्याच दराने भरण्याची मुभा देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.
मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर काही दिवसांतच लागलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य गोरगरिबांवर आर्थिक संकट ओढवले. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी शिवसेनेने गेल्या काही दिवसांत पाच वर्षांनी होणारी मालमत्ता करवाढ, पाणी पट्टीवाढ, मंडई-गाळे यांची भाडेवाढ रोखली आहे. याला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला. तसेच भाडेकरूंवरील प्रस्तावित मालमत्ता कर वसुलीदेखील रोखण्यात आली आहे. आता प्रशासनानेदेखील सलग दुसऱ्य़ा वर्षी मालमत्ता करात वाढ न करता आहे त्याच दराने मालमत्ता कर भरण्याची मुभा देण्याचा निर्णय घेतला आहे.
कोविडच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाल्याचा विचार करून मालमत्ता करदात्यांवर करवाढीचा अतिरिक्त बोजा पडू नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
असा आकारला जातो कर
मालमत्ता करात 9 प्रकारचे उपकर समाविष्ट असतात. मात्र मूळ कराची मोजणी इमारतीचे आयुष्य, जागेचा रेडिरेकनर दर, वापर आणि इतर बाबींच्या आधारे केली जाते. त्यावर उपकराचे दर ठरतात. या वर्षी पालिकेने मूळ कर आणि उपकरांचे प्रमाण तेच ठेवले आहे. दरम्यान, रेडिरेकनरचा 2021चा दर धरल्यास मूळ करात वाढ होऊन त्याचा परिणाम उपकरांच्या गणनेवर होण्याची शक्यता आहे. मात्र 2021-22मध्ये 2020-21च्या दरानुसारच मालमत्ता कर आकारला जाणार आहे.
































































