धारावी लसीकरणात लखपती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या दुसऱ्य़ा लाटेला यशस्वीपणे रोखत 16 वेळा एकही रुग्ण न सापडलेल्या धारावीने आता लसीकरणातही आघाडी घेतली असून आज लसीकरणात लाखाचा टप्पा पार केला. धारावीत आतापर्यंत 1 लाख 2 हजार 489 जणांचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे कोरोनाला रोखत लसीकरणाला गती देत आणखी एक मजबूत वाटचाल धारावीने सुरू केली आहे.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि अत्यंत दाटीवाटीची वस्ती असलेल्या धारावीसाठी मुंबई महापालिकेने कोरोनाच्या पहिल्या आणि आता दुसऱ्य़ा लाटेतही सुरुवातीपासून आक्रमक उपाययोजना करत कोरोनावर नियंत्रण ठेवले. दुसऱ्य़ा लाटेत सर्वात कमी रुग्ण संख्या त्याच वेळी 16 वेळा झिरो पॉझिटिव्ह अशी कामगिरी मुंबईतील कोणत्याही अन्य विभागाला करता आलेली नाही. त्यासाठी टेस्टिंग, ट्रकिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटिंग अशा चार टी सूत्रांवर भर देत धारावी मॉडेल पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली जी-दक्षिणचे आयुक्त किरण दिघावकर यांनी सर्वशक्तिनिशी राबवले आहेत.