
दर चार वर्षांनी होणाऱया महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या (एमओए) निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. अध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने ते पुन्हा एकदा बिनविरोध अध्यक्ष होणार आहेत. मात्र इतर पदांसाठी अनेक अर्ज आल्याने अर्ज माघारीपर्यंत काय घडामोडी घडतात, याकडे महाराष्ट्रातील तमाम क्रीडाप्रेमींचे लक्ष असणार आहे.
21 पदांसाठी 64 अर्ज
‘एमओए’ची यंदाची वार्षिक सर्वसाधारण सभा 24 सप्टेंबर रोजी पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार आहे. या सभेतच निवडणूक प्रक्रियादेखील पार पडणार आहे. निवडणूक अधिकारी एस. एन. सरदेसाई यांनी अर्ज भरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. एमओएच्या एकूण 21 पदांसाठी तब्बल 64 अर्ज आले आहेत. केवळ अध्यक्षपदासाठी अजित पवार यांचा एकमेव अर्ज आला असून इतर पदांसाठी मोठी रस्सीखेच बघायला मिळणार आहे. यात 4 उपाध्यक्षपदांसाठी 11 अर्ज, 4 सहसचिव पदांसाठी 18 अर्ज, तर 9 कार्यकारिणी पदांसाठी 21 अर्ज आले आहेत. एका वरिष्ठ उपाध्यक्ष पदासाठी 4, एका सरचिटणीस पदासाठी 4, तर एका खजिनदार पदासाठी 5 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
बाळासाहेब लांडगे यांचा वरिष्ठ उपाध्यक्षपदासाठी अर्ज
20 वर्षांहून अधिक काळ ‘एमओए’चे सरचिटणीस राहिलेले बाळासाहेब लांडगे यंदा हे पद वगळून वरिष्ठ उपाध्यक्षपदासाठी रिंगणात उतरले आहेत. धनंजय भोसले, प्रदीप गंधे, अशोक पंडित यांचे त्यांना आव्हान असेल. मात्र ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक आहे. कारण धनंजय भोसले, प्रदीप गंधे व अशोक पंडित यांनी उपाध्यपदासाठीदेखील अर्ज दाखल केले आहेत. नामदेव शिरगावकर यांनीदेखील उपाध्यक्ष व सरचिटणीस या दोन पदांसाठी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, नामदेव शिरगावकर हे सरचिटणीस पदासाठी अधिक जोर लावण्याची शक्यता आहे. जय कवळी यांनीदेखील उपाध्यक्ष व सरचिटणीस पदासाठी अर्ज दाखल केले आहेत. चंद्रजित जाधव यांनी सरचिटणीस, सहसचिव व खजिनदार अशा तीन पदांसाठी अर्ज भरले आहेत. धनंजय भोसले यांनी वरिष्ठ उपाध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस व खजिनदार अशा चार पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
18 सप्टेंबरला चित्र स्पष्ट होणार
जाहीर झालेल्या ‘एमओए’च्या निवडणूक प्रक्रियेनुसार 17 सप्टेंबरला अर्जांची छाननी होऊन अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार आहे. 18 सप्टेंबरला उमेदवारांचा अर्ज माघारी घेण्याचा दिवस असेल. याचाच अर्थ 18 सप्टेंबरला ‘एमओए’च्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असून 24 सप्टेंबरला निवडणूक प्रक्रिया पार पडेल.






















































