
ऑनलाइन वीज बिल भरणे सोपे झालेले असतानाही आज साडेचार लाखांहून अधिक महावितरणचे ग्राहक धनादेशाद्वारे बिल भरत आहेत. त्यापैकी महिन्याला जवळपास दहा हजार पाचशे धानदेश खाडाखोड, चुकीची स्वाक्षरी, तारखेतील घोळ आणि खात्यात कमी रक्कम असल्याने बाऊन्स ठरत आहे. त्यामुळे माघारी आलेल्या धनादेशाच्या महावितरणला दुबार नोंदी ठेवाव्या लागत असून दंडाचा भुर्दंड बसत आहे, तर ग्राहकाला जवळपास दंड, जीएसटी, विलंब शुल्काच्या माध्यमातून जवळपास 885 रुपयांचा भुर्दंड बसत आहे.
महावितरणचे राज्यभरात अडीच कोटी वीज ग्राहक असून त्यापैकी चार लाख 51 हजार ग्राहक धनादेशाद्वारे वीज बिलाचा भरणा करतात. दरम्यान, धनादेशाद्वारे वीज बिल भरणाऱया ग्राहकाचा धनादेश बाऊन्स झाल्यास महावितरण आणि ग्राहक या दोघांनाही बँकेकडून दंड आकारला जातो. वीज कंपनीला आकारला जाणारा दंड, विलंब शुल्काची रक्कम आणि जीएसटी अशी असे जवळपास 885 रुपये महावितरण संबंधित ग्राहकाच्या पुढील वीज बिलात वाढवून लावते. त्यामुळे ग्राहकाचे वीज बिल फुगत आहे. दरम्यान, चेक बाऊन्स झाल्यानंतर लागणारी दंडाची रक्कम संबंधित ग्राहक भरत असला तरी महावितरणला त्याचे रेकॉर्ड ठेवावे लागते. सदरच्या ग्राहकाचा ग्राहक क्रमांक शोधून त्यामध्ये दंड, विलंब शुल्क, जीएसटीची रक्कम आकारावी लागते. ही वेळखाऊ प्रक्रिया असल्याने महावितरणची डोकेदुखी वाढली आहे.
धनादेशाने वीज बिल भरणाऱया जास्तीत जास्त ग्राहकांना विलंब शुल्काचा फटका
वीज बिल भरण्याची अंतिम तारीख जवळ आल्यानंतर अनेक ग्राहक महावितरणच्या वीज बिल भरणा केंद्रावर धनादेश जमा करतात. मात्र अनेकदा बँकांना जोडून येणाऱया सुट्टय़ा किंवा धनादेश वटण्यास विलंब झाल्यास महावितरणकडे सदरची रक्कम उशिराने जमा होते. त्यामुळे अनेक ग्राहकांना पुढील वीज बिलात विलंब शुल्क लागतो. तो टाळण्यासाठी ग्राहकांनी ऑनलाइन वीज बिलाचा भरणा करावा किंवा वीज बिलाची रक्कम दहा हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर आरटीजीएस, एनईएफटीने बिल भरावे, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.
























































