
कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेचा धोका कायम असल्यामुळे गणेशोत्सव काळातही कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱयांवर कारवाई सुरूच ठेवली आहे. गेल्या पाच दिवसांत दरदिवशी सरासरी 10 हजारांहून अधिक जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून 21 लाखांहून अधिक दंड वसूल केला. त्यामुळे संभाव्य तिसऱया लाटेच्या धोक्यातही मुंबईकर बेफिकिरीने वागताना दिसत आहेत.
कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिका सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱयांवर एप्रिल 2020 पासून कारवाई करत दंड वसूल करत आहे. मात्र आजही बेफिकीरपणे वावरणाऱया, विनामास्क फिरणाऱयांची संख्या कमी झालेली नाही. महापालिकेची गणेशोत्सव काळातही कारवाई सुरू असून 7 ते 11 सप्टेंबर या काळात 53 हजार 643 जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 1 कोटी 7 लाख 28 हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यानुसार पाच दिवसांत रोज सरासरी 10 हजार 728 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 21 लाखांहून जास्त दंड वसूल करण्यात आला आहे. विनामास्क फिरणाऱया मुंबईकरांकडून पालिकेने आतापर्यंत 67 कोटी 85 लाखांचा दंड वसूल केला आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सवानंतर मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. त्या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात येत आहे.




























































