भंडारदऱ्यापाठोपाठ निळवंडे धरणही भरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाणलोटात सुरू असलेल्या तुफान पावसामुळे भंडारदरा धरण काल ओव्हर फ्लो झाले होते. त्यापाठोपाठ जिल्ह्यातील तिसरे महत्त्वाचे असलेले निळवंडे धरणही सोमवारी सायंकाळी पूर्ण क्षमतेने भरल्याचे जलसंपदा विभगाकडून जाहीर करण्यात आले. निळवंडे धरणातून सुरू असलेल्या दहा हजार 856 क्युसेकच्या विसर्गामुळे यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच प्रवरा नदीला पूर आला आहे, तर भंडारदरा धरणातूनही 12 हजार 104 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

निळवंडे व भंडारदऱयातील पाणलोटक्षेत्रात अतिवृष्टी सुरूच आहे. यामुळे दोन्ही धरणांत नवीन पाण्याची जोरदार आवक होत आहे. भंडारदरा धरणातून सोमवारी सकाळी 7 हजार 744 क्युसेकने विसर्ग सुरू होता. त्याचा परिणाम निळवंडे धरणाच्या पाणीसाठय़ात झपाटय़ाने वाढ होऊन सोमवारी दुपारी निळवंडे धरण तांत्रिकदृष्टय़ा पूर्ण भरले, तर भंडारदरा धरणाचा विसर्ग सोमवारी रात्री 12 हजार 104 क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला होता. निळवंडे धरणातून सोमवारी सकाळी प्रवरा नदीपात्रात 3 हजार 360 क्युसेकने विसर्ग सुरू होता. दुपारी दोनच्या सुमारास 8 हजार 144, तर सायंकाळी तब्बल दहा हजार 856 क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. दरम्यान, पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर टिकून असल्याने विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

भंडारदरा पाणलोटातील रतनवाडीत आणि घाटघर परिसरात गेल्या दोन-चार दिवसांपासून धो धो पाऊस कोसळत आहे. भंडारदरा, घाटघर, पांजरे, उडदावणे आणि वाकीतही जोरदार पाऊस कोसळत आहे. कळसूबाई डोंगर रांगांतही मुसळधार पाऊस कोसळत असल्याने बारी, जागीरदारवाडी, वारंघुशी, वाकी परिसरात पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कृष्णवंती नदी दुथडी भरून वाहत आहे.

जामखेडमधील खैरी मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो

जामखेड – तालुक्यातील सर्वांत मोठा खैरी मध्यम प्रकल्प सोमवारी (दि. 13) दुपारी चार वाजता पूर्ण क्षमतेने भरला असून, तालुक्यातील अन्य सात लघू पाटबंधारे तलाव यापूर्वीच पूर्ण क्षमतेने भरले आहेत. दरम्यान, धोंडपारगाव, जवळके व अमृतलिंग हे तीन लघू पाटबंधारे तलाव आजही कोरडेच आहेत. 100.49 दशलक्ष घनफूट क्षमता असलेला पिंपळगाव आळवा लघू पाटबंधारे तलाव 40 टक्के भरला असून, 48.77 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे, तर 87.94 दशलक्ष घनफूट क्षमता असलेला धोंडपारगाव लघू पाटबंधारे तलावात केवळ नऊ टक्के पाणीसाठा असून, हा तलाव आजही कोरडा असल्यातच जमा आहे. 48.40 दशलक्ष घनफूट क्षमता असलेला अमृतलिंग लघू पाटबंधारे तलाव आणि 36.19 दशलक्ष घनफूट क्षमता असलेला जवळके लघू पाटबंधारे तलाव आजही कोरडाच आहे.

मुळा धरणही भरण्याच्या मार्गावर

कोतुळकडून मुळा धरणात सुरू असलेली पाण्याची आवक टिकून राहिल्यास गणेश विसर्जनापूर्वीच धरण तांत्रिकदृष्टय़ा भरण्याची शक्यता आहे.

सोमवारी सायंकाळी 6 वाजता मुळाधरणाचा पाणीसाठा 23 हजार 207 दशलक्ष घनफूट झाल्याने 26 हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठवण क्षमतेचे मुळाधरण 89.25 टक्के भरले आहे. सोमवारी सायंकाळी 6 वाजता कोतुळकडून 13 हजार 375 क्युसेकने उच्चांकी आवक सुरू होती. 12 तासांत मुळा धरणात 293 दलघफू नवीन पाण्याची वाढ झाली आहे.

जून व जुलै महिन्यातील पावसाची चार नक्षत्रे कोरडी गेल्याने मुळा धरण यंदा पूर्ण क्षमतेने भरेल की नाही, अशी शंका निर्माण झाली होती. मात्र, पुनर्वसू, पुष्यपाठोपाठ पूर्वा व उत्तरा नक्षत्रातील मुसळधार पावसामुळे मुळा धरणाचा पाणीसाठा 89.25 टक्क्यांवर गेला आहे.