वाई तालुक्यात विवाहितेची मुलासह आत्महत्या; विवाहितेचा मृत्यू, बालकावर उपचार सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सासरच्या त्रासाला कंटाळून वाई तालुक्यातील वरचे चाहूर येथील विवाहितेने तीन वर्षांच्या बालकाला विषारी तणनाशक पाजून स्वतःही प्राशन केले. सातारा येथे उपचारांदरम्यान विवाहितेचा मृत्यू झाला, तर बालकावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पूजा सुदाम भोरे (वय 27) असे मृत महिलेचे नाव आहे. तर, राजवीर सुदाम भोरे असे बालकाचे नाव आहे.

वरचे चाहूर येथील पूजा भोरे हिला सासू, सासरे, पती, नणंद यांच्याकडून जाच केला जात होता. या त्रासाला कंटाळून तिने राहत्या घरी विषारी औषध पिऊन राजवीरलाही पाजले. ही घटना लक्षात येताच दोघांनाही सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान पूजाचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. राजवीरवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी पूजाचा पती सुदाम भगवान भोरे, सासरे भगवान बाबूराव भोरे, सासू हिराबाई भोरे (रा. वरचे चाहूर, भुईंज), नणंद माधुरी किसन देडे (रा. काकरंबा, तुळजापूर, जि. धाराशिव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, भुईंज येथील स्मशानभूमीत पूजावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

घटनास्थळी वाईच्या पोलीस उपअधीक्षक शीतल जानवे-खराडे, भुईंजचे सहायक पोलीस निरीक्षक आशीष कांबळे यांनी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या. या घटनेची भुईंज पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे तपास करीत आहेत.