
>> महेश उपदेव
नागपूरच्या शिवाजी नगर जिमखान्याची युवा खेळाडू सिया देवधर हिने परदेशात आपल्या नावाचा झेंडा रोवून नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. ती लवकरच हिंदुस्थानच्या युवा बास्केटबॉल संघात चमकणार आहे. तो क्षण नागपूरसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
नागपूरची सिया देवधर हिने आतापर्यंत सहा वेळा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत या युवा खेळाडूने एनबीएलाही आपल्या आक्रमक क्रीडा शैलीची दखल घ्यायला भाग पाडले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात नागपूरचे बास्केटबॉल खेळाडू आता चमकायला लागले आहेत. त्याकरिता नागपूरचे क्रीडेसाठी पोषक असलेले वातावरण फायद्याचे आहे.
1985 मध्ये नागपूरमध्ये स्थापन झालेल्या शिवाजी नगर जिमखान्याने गेल्या 36 वर्षांत मोठी भरीव कामगिरी केली आहे, अनेक राष्ट्रीय खेळाडू घडविले आहेत. छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू जिमखान्याने नागपूरला दिले आहेत. छत्रपती पुरस्कार विजेता शत्रुघ्न गोखले जिमखान्याची धुरा सांभाळत आहे. आजघडीला 300 ते 350 लहानमोठे खेळाडू रोज बास्केटबॉलचे धडे गिरवत आहेत. या जिमखान्याचा मी आजीवन सदस्य आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.
वयाच्या आठव्या वर्षापासून शिवाजी नगर जिमखान्यामध्ये बास्केटबॉल खेळायला जाणाऱया सियाने आपल्या पहिल्याच बास्केटबॉल स्पर्धेत बेस्ट प्लेअरचा पुरस्कार मिळवत आपली झेप मोठी असल्याचे दाखवून दिले. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमधील तिची कामगिरी पाहून बास्केटबॉल महासंघाच्या वतीने तिला शिष्यवृत्ती देण्यात आली. अमेरिकेच्या कॅन्सास प्रांतात लाईफ प्रेप अकादमीमधून ती बारावी करीत असून स्थानिक नेक्स्ट लेव्हल एक्लिप्स क्लबकडून ती बास्केटबॉल खेळते. याशिवाय, विविध स्तरांवरील बास्केटबॉल प्रशिक्षण शिबिरांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करीत तिने पुरस्कारही मिळविले आहेत.
गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात शिकागो येथे झालेल्या ‘बास्केटबॉल विदाऊट बॉर्डर्स’ या जागतिक स्तरावरील प्रशिक्षण कार्यक्रमात तिने सहभाग घेतला होता. सिया देशातील केवळ तीन महिला बास्केटबॉलपटूंपैकी एक आहे, जिने एनबीए इंडियाच्या तीन प्रशिक्षण शिबिरांमध्ये सहभाग तर घेतलाच, शिवाय पुरस्कारही मिळविले.
दरम्यान, कॅन्सासमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टय़ा लागल्यानंतर ती हिंदुस्थानात नागपूरला परत आली आणि तिला बंगळुरूमध्ये होणाऱया राष्ट्रीय चमू निवड प्रशिक्षण कॅम्पमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. जॉर्डन येथे होऊ घातलेल्या फिबा आशिया चषक स्पर्धेत देशाच्या महिला बास्केटबॉल संघात प्रतिनिधित्व करण्याची संधी सियाला मिळणार आहे. संघ निवडीच्या या प्रक्रियेत सर्वोत्तम सोळा खेळाडूंमध्ये नागपूरच्या सिया देवधरची निवड झाली आहे हे विशेष! तिची निवड अंतिम बारामध्ये झाल्यास विदर्भात देशाच्या बास्केटबॉल संघात निवड झालेली ती पहिलीच युवा खेळाडू ठरणार आहे. सियाचे आईवडील श्रीश आणि स्वाती देवधर यांनी तिच्या या प्रगतीचे कौतुक करून सार्थ अभिमान व्यक्त केला आहे.
n महेश उपदेव





























































