
कोरोना लढय़ात हिंदुस्थानने शुक्रवारी लसीकरणाचा नवा विक्रम रचला. अवघ्या नऊ तासांत तब्बल 2 कोटींहून अधिक लोकांचे लसीकरण करण्यात आले. प्रत्येक सेकंदाला 700, मिनिटाला जवळपास 42 हजार तर प्रत्येक तासाला 20 लाखांहून अधिक लोकांना डोस देऊन या विक्रमाची नोंद करण्यात आली. तसेच चौथ्यांदा एका दिवसात एक कोटी डोसचा टप्पा पार करण्याची किमया केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी 2 कोटी डोसचा विक्रम नोंदवला.
मुंबईत ‘लेडीज स्पेशल’, दिवसभरात एक लाख डोस
मुंबईत शुक्रवारी ‘लेडीज स्पेशल’ लसीकरण मोहिमेला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. दिवसभरात 1 लाख 7 हजार 934 महिलांचे लसीकरण महापालिकेने केले. महिलांची वाढती संख्या पाहता लसीकरणाची वेळ आणखी दोन तासांनी वाढवली. यावेळी 321 लसीकरण केंद्रांवर पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत 57 टक्के पुरुषांचे लसीकरण झाले आहे तर महिलांचे केवळ 43 टक्के लसीकरण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर खास महिलांसाठी लसीकरण राबविण्यात आले.





























































