मराठीशी इमान राखणारा दिग्दर्शक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सीमा खंडागळे

कोल्हापूरने महाराष्ट्र चित्रपटसृष्टीला अनेक दिग्गज कलाकार व तंत्रज्ञ दिले आहेत. यामध्येच मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक अनंत माने यांचे नाव घेता येईल. 15 सप्टेंबर 1930 साली अनंत माने यांचा जन्म कोल्हापूरमध्ये झाला. त्यांचे चुलतकाका हे त्या काळी कोल्हापुरात असणाऱया प्रभात स्टुडिओमध्ये मूक चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते होते. त्यामुळेच अनंत माने यांचा चित्रपटसृष्टीशी जवळचा संबंध आला व त्यांच्यामध्ये अभिनेता होण्याची आवड निर्माण झाली. इयत्ता सातवीनंतर शिक्षण सोडून अनंत माने यांनी प्रभातमध्ये रसायन विभागात सुमारे चार वर्षे काम केले. या कामामुळे त्यांना चित्रपटातील तांत्रिक व कलात्मक कौशल्य जवळून पाहता आले, आत्मसात करता आले. याचा खूप फायदा त्यांना आपल्या पुढील कारकीर्दीत झाला.

आपल्या अभिनयाची हौस भागावी म्हणून त्यांनी प्रभातमधील अनेक चित्रपटांत छोटय़ा भूमिका केल्या. यामध्ये हिंदुस्थानातील पहिला बोल रंगीत चित्रपट ‘सैरंध्री’, मराठी चित्रपट ‘कुंकू’ यांचा प्रामुख्याने समावेश होतो. प्रभातमधून बाहेर पडल्यावर अनंत माने यांनी राजा नेने यांच्यासोबत सहदिग्दर्शकाचे काम सुरू केले. त्यांनी राजा नेने यांच्यासोबत सहदिग्दर्शक म्हणून केतकीच्या बनात, पठ्ठे बापूराव, संत रामदास या चित्रपटांसाठी सहदिग्दर्शक म्हणून काम केले. स्वतंत्रपणे दिग्दर्शनाची संधी ही त्यांना 1948 साली ‘जय भीम’ या हिंदी बालचित्रपटाद्वारे मिळाली. या चित्रपटात विश्वास कुंटे व सुलक्षणा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाला बऱयापैकी यश मिळाल्यानंतर अनंत माने यांनी मागे वळून पाहिले नाही.

त्यांच्या काही चित्रपटांना यश मिळाले, तर काहींना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. याच वेळेस अनंत माने यांना कमी खर्चात तमाशापट बनवण्याची ऑफर देण्यात आली. अनंत माने यांनी ही संधी न दवडता उषाकिरण, बाबुराव पेंढारकर, सूर्यकांत मांढरे, सुलोचना या अभिनेत्यांना घेऊन ‘पुनवेची रात्र’ हा चित्रपट बनवला. या चित्रपटाचे गीत व संवाद ग. दि. माडगूळकर यांनी लिहिले होते. चित्रपट यशस्वी ठरला व यानंतर अनंत माने यांनी रंगपंचमी, सवाल माझा ऐका, केला इशारा जाता जाता, एक गाव बारा भानगडी, हळदीकुंकू हे यशस्वी तमाशाप्रधान मराठी चित्रपट मराठी रसिकांना दिले, पण अनंत माने यांचा सर्वात यशस्वी ठरलेला व मराठी चित्रपटसृष्टीत एक मैलाचा दगड ठरलेला चित्रपट म्हणजे 1959 प्रदर्शित झालेला ‘सांगत्ये ऐका’. जयश्री, सुलोचना, सूर्यकांत मांढरे, हंसा वाडकर, वसंत शिंदे या दिग्गजांनी या चित्रपटात अभिनय केला होता.

गो. गं. पारखी यांच्या कादंबरीवर आधारलेला ‘सांगत्ये ऐका’चे संवाद व्यंकटेश माडगूळकर यांनी लिहिले होते, तर चित्रपटासाठी गीते ही ग.दि. माडगूळकर यांनी लिहिली होती. संधीचे सोने करत राम कदमांनी ‘सांगत्ये ऐका’ला अजरामर असे संगीत दिले. ‘सांगत्ये ऐका’ने एकाच चित्रपटगृहात सलग 131 आठवडे चालण्याचा त्या काळी इतिहास रचला होता. पुण्यातील विजयानंद चित्रपटगृहात सलग 131 आठवडे हा चित्रपट हाऊसफुल चालला होता. पुढील कारकीर्दीत अनंत माने यांनी कौटुंबिक,विनोदी,ग्रामीण अशा अनेक विषयांवरील चित्रपट बनवले, काही यशस्वीही झाले, पण तमाशावर आधारित चित्रपट बनवणारा यशस्वी दिग्दर्शक अशीच त्यांची ओळख राहिली. आपल्या 58 वर्षांच्या कारकीर्दीत 58 हिंदी व मराठी चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले. कोल्हापुरातील चित्रनगरीच्या निर्मितीसाठीही त्यांचा हातभार खूप मोठा होता. अनंत माने यांचे यश यासाठी वाखाणण्याजोगे आहे की, त्यांनी आपली कारकीर्द अशावेळी सुरू केली होती की, ज्या वेळेस मराठीतील अनेक मातब्बर संस्था डबघाईस आल्या होत्या तसेच हिंदी चित्रपटांचे पेवही महाराष्ट्रात वेगाने पसरत होते, या प्रतिकूल परिस्थितीत अनंत माने यांनी मराठी मातीशी निगडित असे कलात्मक व नावीन्यपूर्ण आशय असलेले चित्रपट रसिकांसाठी सादर केले. मराठीशी इमान राखत आपल्या बोलीभाषेत चित्रपटांचे दिग्दर्शन केले हेच अनंत माने यांचे मोठेपण होते.

[email protected]

(लेखिका जनसंपर्क व सोशल मीडिया क्षेत्रात कार्यरत आहेत.)