
चाकरमान्यांच्या स्वागतासाठी सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ सज्ज झाले आहे. या विमानतळाला डीजीसीएने आज अधिकृत परवाना बहाल केला. त्यामुळे 9 ऑक्टोबरला उद्घाटनानंतर सिंधुदुर्गातील हवाई वाहतूक विनासायास सुरू होणार आहे. एअर अलायन्सचे एक विमान दररोज येथे येईल आणि मुंबईतील चाकरमान्यांना फक्त 2400 रुपयांत सिंधुदुर्गात येता येईल.
तब्बल 800 कोटी रुपये खर्च करून आयआरबी सिंधुदुर्ग एअरपोर्ट प्रा. लि. या कंपनीने हा विमानतळ उभारला असून येथून केवळ प्रवासी वाहतूकच नव्हे तर भविष्यात मालवाहतूकही केली जाईल. त्यामुळे कोकणच्या आर्थिक विकासाला हातभार लागेल असे मानले जाते.
दरम्यान, चिपी विमानतळाच्या परवानगीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सुरेश प्रभू यांच्यासह खासदार राजीवप्रताप रूडी, प्रफुल्ल पटेल यांच्यासह अन्य मान्यवर मंत्री, अधिकाऱयांचे सहकार्य लाभल्याचे खासदार विनायक राऊत यांनी आवर्जून सांगितले.
बॅ. नाथ पै यांचे नाव देण्याची मागणी
सिंधुदुर्ग विमानतळाचे नाव बॅ. नाथ पै सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळ असे नामकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे. बॅ. नाथ पै तसेच प्रा. मधु दंडवते यांच्या नावांना कुणी विरोध करणे हास्यास्पद आहे, असे राऊत म्हणाले.
एअर अलायन्सने ‘उड्डाण’ योजनेंतर्गत येथे प्रवासी वाहतूक करण्याचे जाहीर केले आहे. सुरुवातीच्या पंपनीच्या सर्व्हेनुसार दिवसाला तीन प्रवासी विमाने येथे येणार होती, मात्र ताज्या सर्व्हेनुसार दररोज फक्त एकच विमान येथे येईल. मुंबईहून दुपारी 12 वाजता विमान उडेल आणि दुपारी 1 वा. 10 मिनिटांनी चिपीत पोहचेल. तेच विमान परतीच्या प्रवासात दुपारी 1 वाजून 35 मिनिटांनी उडून मुंबईला 2 वा. 45 मिनिटांनी पोहचेल.

































































