
वांद्रे-कुर्ला संकुल येथे एमएमआरडीए बांधत असलेल्या सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड उड्डाणपुलाचा गर्डर कोसळून 14 जण जखमी झाले होते. गर्डर दुर्घटनाप्रकरणी कंत्राटदार आणि प्रोजेक्ट इंचार्जविरोधात बीकेसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
बीकेसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एमटीएनएल जंक्शन येथे सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडच्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. काम सुरू असतानाच शुक्रवारी पहाटे गर्डर खाली कोसळला. तेव्हा तेथे 14 जण काम करत होते. गर्डर कोसळल्याने 14 कामगार जखमी झाले. या घटनेची माहिती समजताच बीकेसी पोलीस घटनास्थळी आले. जखमी कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 13 कामगारांना उपचार करून घरी सोडण्यात आले असून एका कामगारावर सध्या उपचार सुरू आहेत. गर्डर दुर्घटनाप्रकरणी बीकेसी पोलिसांनी पंत्राटदार आणि प्रोजेक्ट इंचार्जविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गर्डर नेमका कसा कोसळला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक अहवाल आल्यानंतर तो गर्डर कसा कोसळला हे स्पष्ट होणार असून पोलिसांना त्या अहवालाची प्रतीक्षा आहे. याप्रकरणी अद्याप पोलिसांनी कोणाला अटक केली नाही.





























































