
फराळ असो किंवा फास्ट फूड सगळीकडे हमखास लागणारा पदार्थ म्हणजे मैदा. अगदी रोजच्या टोस्ट खारी पावपासून ते केक, बर्गर, न्यूडल्सपर्यंत मैद्याचा वावर सर्वत्र असतो.
आरोग्यासाठी कितीही त्रासदायक असला तरी त्यापासून बनलेल्या पदार्थांमुळे त्याला टाळणं भल्याभल्यांना शक्य होत नाही. पण हा पांढराशुभ्र मैदा नेमका बनतो तरी कशापासून? जशी कणीक ही गव्हापासून, बेसन हे चण्यापासून बनतं, तसंच याचा मूळ जिन्नस कोणता, असा प्रश्न अनेकांना पडतो. कोरा या प्रश्नोत्तराच्या संकेतस्थळावर याचं उत्तर देण्यात आलं आहे.
मैदा हा गव्हाच्या दाण्यांतील एंडोस्पर्म नावाच्या घटकापासून बनतो. एंडोस्पर्म हा गव्हाच्या बियाण्याचा असा घटक आहे जो पुढे वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारे घटक साठवून ठेवतो. थोडक्यात एंडोस्पर्म हे बीजाचे अन्न साठवण्याचे एकक आहे आणि हे मैदा तसेच रवा बनवण्यासाठी उपयोगी पडतं.
त्यापासून बनणारा पांढरा पिठासारखा पदार्थ वेगवेगळे जिन्नस बनवण्यासाठी उपयुक्त ठरतो. शंकरपाळी, करंजीसारखा फराळ, न्यूडल्स, केक, पेस्ट्री, बेकरीत मिळणारे अन्य पदार्थ, विविध प्रकारचे पाव या मैद्यापासूनच तयार केले जातात.




























































