
सोलापूर शहर व परिसरात सोमवारी सायंकाळी मुसळधार पाऊस कोसळला. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने चांगलीच हजेरी लावली. राज्यात वादळी वाऱयासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. त्यानुसार सोमवारी सायंकाळी अचानकपणे मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे रस्त्यावर व सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. यंदा जिल्ह्यात आतापर्यंत 122 टक्के पाऊस झाला आहे. पंढरपूर, अक्कलकोटसह अनेक तालुक्यांत रात्रभर मुसळधार पाऊस झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची पुन्हा हजेरी
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. शाहूवाडी तालुक्यात 5.2 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.




























































