
मनुष्याच्या मृत्यूनंतर उत्तरक्रिया विधी करण्यासाठी नगरपालिकेने प्रवरा आणि माळुंगी नदीच्या संगमावर नदीपात्रातच बांधलेल्या ‘शांती घाटा’चे पैसे पाण्यात गेले असून, आणि नियमबाह्य काम केल्यामुळे जनतेच्या पैशांचा अपव्यय झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या पैशांचा हा ‘दशक्रिया विधी’च असल्याच्या प्रतिक्रिया शहरातून उमटत आहेत.
संगमनेर शहरात मृत्यूनंतरचे क्रियाकर्म करण्यासाठी ‘केशव तीर्थ’ या ठिकाणी प्राधान्य दिले जाते. केशव तीर्थावर व्यवस्थित घाट बांधलेले आहेत. त्या ठिकाणी दहावा, तेरावा किंवा इतर विधी पार पाडतात. असे असूनही नगरपालिकेने प्रवरा आणि म्हाळुंगी नदीच्या संगमावर नदीपात्रात मृत्यूनंतरच्या विधींसाठी लाखो रुपये खर्च करून चौथरे बांधले. नदीपात्रातच बांधकाम करणे हेच मुळात बेकायदेशीर आहे. साधारण सहा वर्षांपूर्वी प्रवरा नदीपात्राच्या सुशोभीकरण या नावाखाली हा शांतीघाट बनविण्यात आला होता. त्यासाठी सुमारे 70 लाख रुपये खर्च झाले. मात्र, हा घाट बांधत असताना पालिकेने तांत्रिक बाबींचा विचार केला नसल्याचे पुढे आले आहे.
चार दिवसांपूर्वी प्रवरा नदीला पूर आला होता. त्यावेळी प्रवरा नदीच्या संगमावर असलेल्या या शांतीधाम क्रियाविधीचा चौथरा पूर्णपणे पाण्याखाली बुडालेला होता. दोन-तीन दिवस त्या ठिकाणी विधी करता आला नाही. आता पाणी कमी झाल्याने हा चौथरा पुन्हा खुला झाला आहे. मुळात चौथरा येथे नियमबाह्य बांधलाच कसा गेला, असा सवाल उपस्थित होत असून, याबाबत जलसंपदा, पाटबंधारे विभाग आणि नगरपालिका प्रशासन मौन बाळगून आहेत.
सदर शांती घाटाच्या बांधकामाला पाटबंधारे विभागाने परवानगी दिलेली आहे. तसेच या बांधकामासाठी सुमारे 60 ते 70 लाख रुपये खर्च झाला असून, बांधकाम रीतसर पूर्ण केलेले आहे. पूरनियंत्रण रेषेसंदर्भात तांत्रिक माहिती घेऊन कळवतो. – श्रीनिवास पगडाल, प्रशासकीय अधिकारी, संगमनेर नगरपरिषद.
नगरपालिकेने पूर नियंत्रण रेषेचा विचार न करता प्रवरा आणि म्हाळुंगी नदीपात्रातच बांधलेल्या ‘शांती घाटा’मुळे नागरिकांचे लाखो रुपये ठेकेदाराच्या खिशात गेले आहेत. कोरोना महामारीमध्ये नागरिकांना घरपट्टी, पाणीपट्टी माफीला नकार देणाऱया संगमनेर नगरपालिकेने अशा अनेक कामांच्या माध्यमातून नागरिकांच्या पैशांचा अपव्यय केला आहे. – अमोल खताळ, सामाजिक कार्यकर्ते.




























































