राजापूरच्या धुतपापेश्वर मंदिराचा प्राचीन मंदिर संवर्धन आराखड्यात समावेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य शासनाने रस्ते विकासाचे काम पाहणाऱ्या एमएसआरडीसीवर राज्यातील प्राचीन मंदिराच्या जतन-संवर्धनाची जबाबदारी टाकली आहे. यासाठी अर्थसंकल्पात 101 कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. राज्यातील 8 प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी बृहत आराखडा करण्यात येणार आहे. या आराखड्यात राजापूर येथील धूतपापेश्वर या मंदिराचा समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील 8 प्राचीन मंदिरांच्या जतन व संवर्धनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने चार सल्लागार कंपन्यांची नियुक्ती केली आहे. मंदिर संवर्धनासाठी बृहत आराखडा तयार करण्यासह निविदा प्रक्रिया राबवण्याची जबाबदारी सल्लागार कंपन्यांवर असणार आहे. त्यानुसार पुढील 3 महिन्यांत बृहत आराखडा पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर कामासाठी निविदा काढत 2022 च्या सुरूवातीला प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर काही महिन्यांतच एमएसआरडीसीने राज्यातील नाशिकमधील गोंदेश्वार, कार्लामधील एकविरा, संभाजीनगरमधील खंडोबा, गडचिरोलीमधील शिव, मार्कंडा, बीड माजलगावमधील भगवान पुरुषोत्तम, कोल्हापूरमधील कोपेश्वार, अमरावतीमधील आनंदेश्वार शिवमंदिर व रत्नागिरी राजापूरमधील धूतपापेश्वर या 8 प्राचीन मंदिराच्या संवर्धनाचा निर्णय घेतला. या कामाची निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी सल्लागारांची नियुक्ती करण्यासाठी निविदा काढली. या निविदेला 8 कंपन्यांनी प्रतिसाद दिला असून यातील 4 कंपन्यांची अखेर सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.