
बारा बलुतेदार पद्धती, प्राचीन कला व खेळ ह्यांची शिल्पं, संगीत कारंजे, सांगीतिक जॉगिंग ट्रॅक, खुला रंगमंच इत्यादींमुळे उद्यानाची लोकप्रियता वाढली आहे. धावपळीच्या जीवनामध्ये निवांतपणा आणि विरंगुळा शोधण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे मनोरंजनासह प्राचीन संस्कृतीचे दर्शनही घडविण्याची किमया बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने साधली आहे ती जोगेश्वरी (पूर्व) स्थित मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम मध्ये!

बारा बलुतेदार कार्य पद्धती, प्राचीन खेळ, कला अशी विविधांगी सांस्कृतिक माहिती देणारे हरित केंद्र म्हणून शिल्प ग्रामची ओळख बनली आहे. जोगेश्वरी (पूर्व) येथे जोगेश्वरी विक्रोळी जोड मार्गावर पुनम नगर परिसरात तब्बल 55 हजार चौरस मीटर क्षेत्रावर मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम हे उद्यान फुलले आहे. मात्र ते निव्वळ उद्यान नाही तर सांस्कृतिक वारसा उलगडून दाखवणारे हरित केंद्र देखील आहे. या ठिकाणी बारा बलुतेदार, प्राचीन खेळ, नृत्य यांची शिल्पं आहेत.

शिल्प ग्राम मध्ये खुला रंगमंच (एम्फीथिएटर) देखील तयार करण्यात आला आहे. संगीत, नृत्य, मुक्त संवाद, चर्चासत्र, सभा इत्यादी विविध कार्यक्रमांसाठी किमान 500 व्यक्ती बसू शकतील, इतक्या क्षमतेचा हा खुला रंगमंच आहे. या उद्यानात आकर्षक हिरवळ व वृक्षवेली आहेत. हिरवळीसोबत विविध प्रजातीचे वृक्ष, वेली, झुडपे ठिकठिकाणी असल्याने सदर उद्यानाच्या सौंदर्यात ती भर घालतात.
संगीतमय कारंजे आणि सांगीतिक पदपथ हे आणखी महत्वाचे आकर्षण या ठिकाणी आहे. सांगीतिक तालावर विविध रंगांमध्ये उसळणारे कारंजे अबाल वृद्धांना आनंद देतात. शिल्पग्राम मधील विस्तीर्ण परिसरात फिरताना विविध ठिकाणे जोडणारे सांगीतिक पदपथ (म्युझिकल वॉकिंग ट्रॅक्स) व आकर्षक पायवाटा बांधण्यात आल्या आहेत. संगीत श्रवण करताना हिरवळीवर चालणे आणि सोबत उद्यानातील शिल्पं पाहणे हा आगळावेगळा अनुभव ठरतो.

शिल्पग्राममध्ये ठिकठिकाणी आसनव्यवस्था आहे. उद्यानाच्या सौंदर्यात भर घालणारे वेगवेगळ्या आकाराचे गझेबो आसन व्यवस्थेसह संपूर्ण उद्यानाचे मनोहारी दृश्य पाहता येईल, अश्या रीतीने बनविण्यात आले आहेत. लहान मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र जागेत विविध साहित्य लावण्यात आली आहेत.
शिल्पग्राम उद्यान सकाळी 6 ते 10 आणि दुपारी 4 ते रात्री 8 दरम्यान नागरिकांकरिता खुले असते. दर बुधवारी नियमित परिरक्षणाकरिता ते बंद असते. रविवार व इतर सार्वजनिक सुट्टीदरम्यान नागरिक शिल्पग्रामला भेट देऊन आनंद लुटू शकतात. हे उद्यान पाहण्याकरिता प्रवेश शुल्क आकारले जाते. शिल्पग्रामला दररोज सुमारे 1500 ते 2 हजार नागरिक भेट देतात, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी ह्यांनी दिली आहे.



























































