
क्रूरकर्मा ओसामा बिन लादेनला शहीद संबोधून त्याचे उदात्तीकरण करणाऱया आणि शेजारी देशांना संकटात लोटणारा दहशतवाद पोसणाऱया पाकिस्तानने आम्हाला शांततेचे आणि न्यायाचे धडे देऊ नयेत, अशा तिखट शब्दांत आज संयुक्त राष्ट्र महासभेत हिंदुस्थानच्या महिला सचिव स्नेहा दुबे यांनी पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्या ढोंगी भाषणावर सर्जिकल स्ट्राइक चढवला. आपल्या भाषणात 13 वेळा कश्मीर प्रश्नाचा उल्लेख करून हिंदुस्थानला आरोपीच्या पिंजऱयात उभे करू पाहणारे इम्रान या हल्ल्याने पार क्लीन बोल्ड झाले आहेत.
“दहशतवादी जाळपोळ करणारा हा देश स्वतःला फायर फायटर म्हणवून घेतो. पाकिस्तान आपल्या प्रदेशामध्ये दहशतवाद्यांना आश्रय देतो. त्यामुळे त्यांच्या शेजारच्या देशांची हानी होत आहे. त्यामुळे आम्हालाच नाही तर संपूर्ण जगाला त्रास सहन करावा लागतोय, असे स्नेहा यांनी सुनावले.
स्नेहा यांच्या तडफदार भाषणाची जगभरात चर्चा
स्नेहा यांच्या या भाषणाची जगभरामध्ये चर्चा आहे. सोशल नेटवर्किंगवरही स्नेहा यांचे मोठे कौतुक होताना दिसत आहे. जागतिक मंचावर जगातील सर्वात मोठय़ा लोकशाही देशाचे प्रतिनिधित्व करताना अगदी आत्मविश्वासाने आणि संयमी शब्दांमध्ये स्नेहा यांनी पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणला त्या गोष्टीचे काौतुक केले जात आहे. इतक्या कमी वयामध्ये स्नेहा यांनी केलेली कामगिरी फारच कौतुकास्पद असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. स्नेहा या 2012 च्या बॅचच्या ‘आयएफएस’ म्हणजेच इंडियन फॉरेन सर्व्हिसच्या अधिकारी आहेत. त्यांनी गोव्यामधून त्यांचे शिक्षण पूर्ण केले असून उच्च शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून पूर्ण केले आहे. त्यानंतर दिल्लीमधील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यापीठामधून म्हणजेच ‘जेएनयू’मधून त्यांनी एमफिलचे शिक्षण घेतले आहे.
‘‘पाकिस्तान हा दहशतवाद्यांना आश्रय देणारा आणि अल्पसंख्याकांवर अन्याय करणारा देश आहे. आपले गुन्हे लपवण्यासाठी पाकिस्तानी शासक कश्मीर प्रश्नाचे तुणतुणे वाजवत हिंदुस्थानला बदनाम करू पाहत आहेत. पण जगाने ढोंगी पाकिस्तानचा खरा चेहरा ओळखला आहे.’’ – स्नेहा दुबे




























































