पुणे – विद्यापीठाच्या नावाने बनावट मार्कलिस्टसह तयार करून विकणाऱ्या टोळीला बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह इतर महाविद्यालयांच्या नावाने बोगस पदव्या बनवून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दापाश करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. गणेश संपत जावळे (रा.नीरा), मनोज धुमाळ (रा.नीरा) आणि वैभव लोणकर (रा.बारामती) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह काही महाविद्यालयाच्या नावाने बोगस पदव्या बनवून विक्री करण्यात येत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक संदीप येळे यांना मिळाली. संबंधित टोळी पदवीचे मार्कलिस्ट आणि सर्टिफिकेट नीरा याठिकाणी तयार करून विद्यार्थ्यांना विक्री करीत असल्याचे उघडकीस आले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना शहानिशा करण्यास घेऊन नीरा येथील समीक्षा प्रिंटिंग प्रेस येथे धाड टाकली. त्यावेळी त्याठिकाणी आरोपी बनावट प्रमाणपत्रे बनवीत असल्याची खात्री झाली. त्यानुसार पथकाने बनावट पदवी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके, एपीआय संदिप येळे, रविराज कोकरे, अनिल काळे, सचिन घाडगे, गुरू जाधव, अभिजित एकशिंगे, स्वप्नील अहिवळे, अजय घुले, राजू मोमीन, प्रसन्ना घाडगे यांनी केली.

तरूणांना नोकरीसाठी आवश्यक विविध कागदपत्रांसाठी विद्यापीठासह महाविद्यालयाच्या नावाने बनावट प्रमाणपत्रे विक्री करणाऱ्या टोळीची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून तिघांना अटक केली. त्यांच्याकडून संगणक, प्रिंटर, शिक्के जप्त करण्यात आले आहेत. – अशोक शेळके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण