
सोमवारी रात्री धाराशिव जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील लहान – मोठ्या सर्वच नद्यांना पूर आले असून अनेक गावात पाणी शिरले आहे.
कळंब तालुक्यातील वाकडी येथे काही लोक पुरात अडकले होते, परंतु जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी त्यांना सुखरुप बाहेर काढले आहे. तसेच कळंब तालुक्यातील देवधानोरा येथील तलाव फुटून मोठे नुकसान झाले आहे.
धाराशिव जिल्ह्याला सोमवारी रात्री पावसाने झोडपून काढले आहे. जिल्ह्यातील 12 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून सुमारे पाच मंडळात 100 मी. मी. पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. आगोदर जिल्ह्यात अतिरिक्त पाऊस झाला आहे, त्यातच कालच्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
अगोदर जिल्ह्यातील मांजरा, तेरणा, निम्न तेरणा हे मोठे प्रकल्प भरल्याने यातून पाण्याचा विसर्ग सुरू होता. सोमवारी झालेल्या पावसाने जिल्ह्यातील सर्वात मोठे असणारे सिना कोळेगाव हे धरण देखील भरले असून यातूनही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील तेर, जागजी, ढोकी मंडळात अनुक्रमे 127, 123 व 139 मी. मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे तेरणा नदीस मोठा पूर आला आहे. या पुरामुळे तेर, रामवाडी, दाऊतपूर, इर्ला या गावात पाणी शिरले आहे. तसेच कळंब तालुक्यातील देवधानोरा येथे तलाव फुटून मोठे नुकसान झाले आहे.
वाकडी येथे अडकलेल्या नागरीकांना बाहेर काढले
काल रात्री झालेल्या पावसाने कळंब तालुक्यातील वाकडी येथील सुमारे 17 नागरिक पुरात अडकले होते. या नागरिकांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवांनानी आज 1 वाजण्याच्या सुमारास पुरातून बाहेर काढले आहे.


























































