
कोरोना पॉझिटिव्ह पतीच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने पतीच्या निधनानंतर अवघ्या तासाभरात पत्नीने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापुरातील भय्या चौकातील रेल्वे रुळावर घडली आहे.
आप्पासाहेब रावसाहेब कोरे असे निधन झालेल्या पतीचे, तर प्रियांका ऊर्फ अनसुया कोरे (दोघे रा. मल्लेवाडी, ता. मंगळवेढा) असे आत्महत्या केलेल्या पत्नीचे नाव आहे.
कोरे हे गॅस पाइपलाइन कंपनीमध्ये सुरक्षारक्षक होते. ते कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना सोलापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पतीच्या सेवेसाठी पत्नी प्रियांका या त्यांच्याजवळ होत्या. बुधवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पतीच्या निधनाची माहिती मिळताच प्रियांका यांना मोठा धक्का बसला. या तणावातून प्रियांका यांनी भय्या चौकातील रेल्वे रुळाजवळ जाऊन पुण्याकडे जाणाऱ्य़ा रेल्वेखाली पडून आत्महत्या केली. अवघ्या तासाभरात पतीच्या निधनानंतर पत्नीने केलेल्या आत्महत्येने रुग्णालय परिसरही हादरला.
प्रियांका या मोलमजुरी करून कुटुंबास हातभार लावत होत्या. त्यांना एक मुलगा असून, तो सातवीत शिकतो. प्रियांका यांच्या सासू, सासरे व दिराचे यापूर्वीच निधन झाले आहे. यामुळे कोरे दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा पोरका झाला आहे.



























































