
आपल्या बिनधास्त स्वभावासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री पूजा भट्ट सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. एकेकाळी पूजा अतिमद्य सेवन करायची. ती पूर्णपणे दारूच्या आहारी गेली होती, मात्र सततच्या प्रयत्नांतून 2016 साली तिने मद्याच्या व्यसनापासून स्वतःची सुटका करून घेतली. मद्याचे व्यसन सोडून पाच वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पूजाने खास अंदाजात सेलिब्रेशन केले असून इन्स्टाग्रामवर एक प्रेरणादायी पोस्ट शेअर केली आहे.
मद्याचे व्यसन सोडल्यानंतर जीवनात कशा पद्धतीने सकारात्मक बदल घडत गेले याबद्दलचे आपले अनुभव पूजाने मांडले आहेत. पोस्टमध्ये पूजाने मद्य सेवन सोडल्याचे संपूर्ण श्रेय भावनिक कोलाहलामध्ये वाट दाखवणाऱया आपल्या समजूतदारपणाला दिलंय. माझ्या आयुष्यात आता माझ्याशिवाय इतर कुणालाही प्राधान्य नसेल. माझ्यासाठी माझे मानसिक आरोग्य, मनःशांती सर्वाधिक महत्त्वाचे आहे. माझ्याबद्दल लोक काहीही म्हणत असले तरी माझी निवड स्पष्ट असल्याचे तिने म्हटले आहे. तिची ही पोस्ट व्हायरल होत आहे.



























































