वातावरणीय बदलांवर सर्व देशांनी एकत्र येण्याची आवश्यकता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अक्षय ऊर्जेचा वापर वाढविणे आणि प्रदूषण कमी करण्यावर राज्य सरकारचा भर असून वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने सरकारने विविध महत्त्वपूर्ण उपाययोजनांच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे वातावरणीय बदलांवर नियंत्रणासाठी जागतिक पातळीवर सर्व देशांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज केले.

वातावरणीय बदलांवर नियंत्रणासाठी विचारांची देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र आणि स्वीडन या दोन देशांच्या दरम्यान सह्याद्री अतिथीगृहावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला स्वीडनच्या मुंबईतील महावाणिज्यदूत एना लेकवल, वाणिज्य दूत एरीक माल्मबर्ग, राज्याच्या उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंग, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर आदी उपस्थित होते.

वातावरणीय बदल रोखण्यासाठी महाराष्ट्राने विविध उपाययोजना केल्या आहेत. माझी वसुंधरा, इलेक्ट्रिक वाहन धोरण, उद्योग क्षेत्रात अक्षय ऊर्जेचा वापर, 43 शहरांचा रेस टू झिरो मध्ये समावेश, अर्बन फॉरेस्ट अशा विविध माध्यमातून प्रदूषण कमी करण्याबरोबरच हिरवे आच्छादन वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वीडनचे या क्षेत्रातील काम पाहता महाराष्ट्र आणि स्वीडन एकत्रितरित्या शाश्वततेच्या दिशेने उत्तम काम करतील, असा विश्वास यावेळी आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.