उपचाराचा खर्च परवडत नसल्याने पोटाच्या गोळ्याला पंचगंगेत फेकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

औषधोपचाराचा खर्च परवडत नसल्याने कुटुंबीयासोबत झालेल्या वादातून निर्दयी बापाने आपल्या पाच वर्षांच्या मुलाला पंचगंगा नदीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना हातकणंगले तालुक्यातील कबनूर येथे समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बापाला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, दुसऱया दिवशी सायंकाळी उशिरापर्यंत नदीपात्रात शोधमोहीम सुरू होती.

अंफान सिकंदर मुल्ला (वय 5) असे या दुर्दैवी मुलाचे नाव असून, सिकंदर हुसेन मुल्ला (वय 48, रा. पंचगंगा साखर कारखाना रोड, कबनूर, ता. हातकणंगले) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पत्नी, दहा वर्षांची मुलगी आणि अंफानसह सिकंदर मुल्ला कबनूर येथे राहण्यास आहे. तो अपंग असून, मिळेल ते मजुरीचे काम करून गुजराण करत होता. अंफानला फिटचा आजार असून, औषधोपचाराचा खर्च परवडत नसल्याने घरी सातत्याने वाद होत होता. गुरूवारी मुलाचा उपपचाराच्या खर्चावरून पत्नी व नातेवाइकांशी त्याचा पुन्हा वाद झाला. रागाच्या भरात सिकंदर गुरुवारी सायंकाळी उपचारासाठी जाऊ, असे सांगून अंफानला घेऊन घराबाहेर पडला.

रात्री घरी आल्यानंतर त्याने मुलाला पंचगंगेत फेकल्याचे नातेवाइकांना सांगितले. त्यामुळे शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देऊन चौकशी केली असता अंफानला पंचगंगा नदीवरील मोठय़ा पुलावरून फेकून दिल्याचे त्याने सांगितले. रात्री उशिरापर्यंत अंफानचा शोध घेण्याची मोहीम सुरू होती. आज सकाळपासून पुन्हा त्याचा शोध घेण्यात येत होता. सायंकाळी उशिरापर्यंत अंफानचा मृतदेह सापडला नव्हता.

पात्रातील वाढलेले पाणी आणि मगरींचा धोका

अजूनही अधुनमधून कोसळणाऱ्या पावसामुळे पंचगंगेचे पाणी पात्रालगत आहे. त्यात कबनूरपासून नृसिंहवाडी परिसरातील नदीत मगरींचा मोठा वावर आहे. त्याचाही धोका तसेच अडथळा शोधमोहिमेत दिसून येत होता.