
>> विवेक दिगंबर वैद्य
देवालये, शिवालये, नाथ संप्रदायी चैतन्य स्थाने, साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिस्थान, उत्तुंग बेलाग पर्वतकडे, कोरीव लेण्या यांना जलतीर्थाचा स्पर्श करणारी गोदामाई यामुळे नाशिक क्षेत्राची ओळख ‘दक्षिणेची काशी’ म्हणूनही आहे. गोदावरीच्या काठावरील पावन कुंडे, शेकडो मंदिरे आजही सश्रद्ध मनाला खुणावतात. त्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे हिंदू धर्मीयांच्या हृदयसिंहासनावर अढळ विराजमान झालेल्या श्रीराम-सीतामाईचा येथील वावर आणि वास्तव्य.
दैवी अधिष्ठान लाभलेली भूमी म्हणून नाशिक हे क्षेत्र ओळखले जाते आणि ही ओळख तब्बल इ. स. दीडशेच्या आसपासची आहे. तेव्हा नाशिक ‘धर्मपीठ’ म्हणून परिचित होते. जैन धर्मीयांचे तीर्थकर ज्या धर्मपीठात वास्तव्य करते झाले, त्या नाशिक पुण्यभूमीचे मूळ नाव ‘नासिक्य’ किंवा ‘नव-शिख’ असल्याचे सांगितले जाते. पत्नी सीता आणि बंधू लक्ष्मण यांच्यासह सत्ययुगाचे प्रणेते प्रभू श्रीरामचंद्र यांचे जेथे बराच काळ वास्तव्य घडले ती नाशिकभूमी प्राचीन कालखंडाच्या समृद्ध वारशाची श्रीमंती मिरवत आजही स्थानापन्न आहे.
प्राचीन काळात पद्मनगरी, त्रिपंटक, जनस्थान या संबोधनाने ओळखली जाणारी ही पुण्यभूमी सत्य व द्वापारयुगात अनुक्रमे रामायण आणि महाभारतातील व्यक्तिरेखांमुळे जनप्रिय बनली. लक्ष्मणाने शूर्पणखेचे ‘नाक’ कापून तिला तिच्या अगोचरपणाची अद्दल घडवली ती याच ठिकाणी. म्हणूनच या क्षेत्राचे नाव ‘नासिक्य’ किंवा पुढे ‘नासिक’ असे झाले, तर काहींच्या मते ही भूमी सह्याद्री पर्वतरांगांमध्ये नऊ शिखरांनी वेढलेली असून नऊ शिखांवर अर्थात नऊ शिखरांवर वसलेली असल्याने ‘नव-शिख’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘नाशिक’ हे नाव प्रचलित झाले. असे असले तरी रामायण व महाभारत ग्रंथांच्या मूळ प्रतीमध्ये ‘नाशिक’ या संबोधनाचा थेट उल्लेख नाही. मात्र अन्य काही तत्कालीन ग्रंथांमधून राजवट, राज्यकारभार तसेच व्यक्ती-व्यवहारादी उल्लेखामध्ये ‘नाशिक’ क्षेत्राचा उल्लेख दिसून येतो.
नाशिक येथील ‘पांडवलेणी’, ‘महाभाष्य’ ग्रंथ, ‘आईनेअकबरी’तील नाशिकनजीकचा बागलाण प्रांत, सातवाहन काळातील चांदवड, साल्हेर, देवगिरीतील यादवांच्या वंशगाथेत सिंदिनेर अर्थात सिन्नरचा उल्लेख आढळतो. निजामशाही, मराठे, पेशवे इथपासून ते पार ब्रिटिश राजवट आणि स्वातंत्र्याच्या चळवळीपर्यंत अनेकदा सर्वत्र आणि वारंवार नाशिक क्षेत्राचा उल्लेख करण्यात आल्याचे दिसून येते.
देवालये, शिवालये, नाथ संप्रदायी चैतन्य स्थाने, साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिस्थान, उत्तुंग बेलाग पर्वतकडे, कोरीव लेण्या यांना जलतीर्थाचा स्पर्श करणारी गोदामाई यामुळे नाशिक क्षेत्राची ओळख ‘दक्षिणेची काशी’ म्हणूनही आहे. गोदावरीच्या काठावरील पावन पुंडे, शेकडो मंदिरे आजही सश्रद्ध मनाला खुणावतात. त्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे हिंदू धर्मीयांच्या हृदयसिंहासनावर अढळ विराजमान झालेल्या श्रीराम-सीतामाईचा येथील वावर आणि वास्तव्य. नाशिकमधील पंचवटी परिसर हा आपल्या अंगाखांद्यावर साक्षात श्रीरामसीतेच्या चरणकमलांचे ठसे वागविणारा परमभाग्यशाली परिसर आहे. राजदरबाराचा मोह दूर सारून पित्याला दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी वनवासाचा पर्याय पत्करणारे श्रीराम, त्यांना साथ देणारी त्यांची अर्धांगिनी जनककन्या सीता आणि बंधुप्रेमाचे जाज्वल्य प्रतीक म्हणून ज्याचे नाव आदराने घेतले जाते तो श्रीलक्ष्मण नाशिकच्या पंचवटी परिसरात वास्तव्यास होते. ‘पाच’ वड एकाच परिसरात असलेले हे ‘पंचवटी’ स्थान विलक्षण पुण्यशाली आहे. कारण अनादी कालापासून आजपावेतो अनेक देवदेवता, संत व सिद्धसत्पुरुषांचा वावर आणि वास्तव्य येथे झाले आहे. पाच विशाल वटवृक्षांची मुळे एकमेकांत गुंफून येथे जणू सिद्धबेट जन्माला आले. पूर्वी याच परिसरात कण्व मुनींचा आश्रम होता. त्यांचे पाच शिष्य काही कारणाने सूर्यदेवाला अपमानित करते झाले आणि पुढे सूर्याकडून शापग्रस्त झाल्याने वटवृक्षाच्या रूपाने ते या परिसरात स्थिर झाल्याचे लोककथा सांगते. येथून जवळच असलेल्या एका गुंफेमध्ये साक्षात सीतामाईंचे वास्तव्य होते आणि रामायणातील राम-सीता व लक्ष्मण या तीन प्रमुख व्यक्तिरेखा येथे काही काळ नांदल्या हेच या ‘पंचवटी’ स्थानाचे माहात्म्य आहे.
पुढे याच पंचवटी परिसरात पेशवेकाळातील गोपिकाबाई पेशवे यांच्या प्रेरणेतून सरदार खंडेराव आणि रंगराव या ओढेकर बंधूंनी ‘श्रीराम-सीता-लक्ष्मण’ या मानवरूपी श्रद्धेय देवतांची स्मृती ‘श्री काळाराम’ मंदिराच्या उभारणीतून जतन केली. हेमाडपंथी धाटणीचा भास निर्माण करणारे काळ्या दगडातील रेखीव मंदिर तसेच गाभाऱयात स्थापन केलेल्या काळ्या वालुकामय पाषाणातील श्रीराम-सीता व श्री लक्ष्मण यांच्या रेखीव प्रसन्न मूर्ती आजदेखील नाशिक क्षेत्राच्या पंचवटी परिसराचे ‘वैभव’ मानले जाते.
श्री काळाराम मंदिराची उभारणी श्री यंत्रावर केल्याचे सांगितले जाते. मंदिराचा सभामंडप 40 खांबांवर उभारलेला असून त्यास गोस्वामी तुलसीदास यांनी लिहिलेल्या ‘हनुमान चालिसा’ या दिव्य रचनेचे रूपक मानले जाते. मंदिराला चार दरवाजे असून पूर्वेकडील दरवाजाला ‘महाद्वार’ म्हणून ओळखण्यात येते. महाद्वारावर नगारखाना आहे. या मंदिराच्या 14 पायऱया प्रभू रामचंद्रांच्या वनवासातील चौदा वर्षांचे प्रतीक असल्याचे मानले जाते, तर काही विद्वानांच्या मते या 14 पायऱया सकलकलाधिपती श्रीरामचंद्रांना अवगत असलेल्या चौदा विद्यांचे प्रतिनिधित्व करतात. सकाळी सूर्योदयाची किरणे गाभारा ओलांडून थेट मूर्तीवर पडावीत अशा रीतीने मंदिर व गाभाऱयाची रचना करण्यात आली आहे. मंदिराच्या चारही बाजूंची संरक्षक भिंत दगडाची असून मंदिर व परिसराला भव्यता प्रदान करणारी आहे. श्रीरामजन्मोत्सवामध्ये येथे रथोत्सवदेखील साजरा केला जातो. या रथोत्सवाकरिता येथे हजारो श्रीरामभक्तांची गर्दी लोटते.
श्री काळाराम मंदिराच्या सभोवताली ओवऱया आहेत. या ओवऱयांमध्ये प्रख्यात सिद्धपुरुष श्री गोपाळदास महंत तथा श्री नरसिंग महाराज यांचे प्रदीर्घ काळ वास्तव्य होते. त्यांच्या भेटीकरिता विदर्भातील प्रख्यात संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज व इंदूर येथील नाथपंथीय सत्पुरुष श्री माधवनाथ महाराज येत असत असा उल्लेख आहे. येथून नजीकच असलेल्या एकमुखी श्री दत्तमंदिरामध्ये श्री स्वामी समर्थांचे शिष्य श्री रामानंद बिडकर महाराज यांचेदेखील वास्तव्य होते. वरील दोन्ही घटनांचा उल्लेख अनुक्रमे ‘श्री गजानन विजय’ व ‘श्री बिडकर महाराज चरित्र’ या ग्रंथांमध्ये विस्तारपूर्वक आलेला आहे. जिज्ञासू वाचकांनी तो जरूर वाचावा अशी विनंती या लेखाच्या माध्यमातून करीत आहे.


























































