
येथील घाटी रुग्णालयातील मार्ड संघटनेचे 300 डॉक्टर्स निवासी डॉक्टर्स काल शुक्रवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. आज या डॉक्टरांनी रुग्णालय परिसरात मोर्चा काढला आणि मागण्यांसंदर्भातील घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
आज संपाचा दुसऱ्या दिवशी या डॉक्टरांनी वैद्यकीय अधीक्षक कार्यालय ते मेडिसिन इमारतीपर्यंत मोर्चा काढून आपल्या वैद्यकीय शुल्क माफ करा, वसतिगृहातील समस्या दूर करा, डॉक्टरांना रुग्णसेवा करण्यासाठी चांगले वातावरण निर्माण करा, मानधन वाढवून द्या या व इतर मागण्या तात्काळ पूर्ण करण्यासाठी घोषणाबाजी केली. मेडिसीन इमार्टिज्वल मोर्चाचे सभेत रूपांतर करण्यात आले. यावेळी स्थानिक मर्डचे अध्यक्ष डॉ. अक्षय क्षीरसागर, डॉ. ऋषिकेश फडणीस, डॉ. आबासाहेब तिडके, डॉ. कांचन देवडे, डॉ. योगिता देवरे, डॉ. दिप्ती आनंद आणि डॉ. सूचित सूर्यवंशी यांनी संपकरी डॉक्टरांना मार्गदर्शन केले.
निवासी डॉक्टर्स संपावर असले तरी कालपासून घाटी रुग्णालयातील अत्यावश्यक शस्त्रक्रिया आणि गंभीर रुग्णांची रुग्णसेवा सुरूच ठेवण्यात आल्याचे या डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान उद्यापर्यंत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर अत्यावश्यक सेवा तसेच शस्त्रक्रिया विषयीच्या सेवा बंद करण्याचा इशारा या निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेने दिला आहे. या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हा बेमुदत संप मार्डच्या मध्यवर्ती संघटनेच्या मार्गदर्शनाखाली सुरूच राहणार असल्याचे घाटी रुग्णालयातील मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. अक्षय क्षीरसागर, डॉ. ऋषिकेश फडणीस यांनी सांगितले. संपात घाटी रुग्णालयातील 300 निवासी डॉक्टर सहभागी झाल्याचे मार्डच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. अमृता माने, डॉ. परिंचे, डॉ. ऋषिकेश गव्हाणे, डॉ. उमेश येवले, डॉ. सौरभ डिकोळे, डॉ. मल्लिका अग्रवाल, डॉ. काव्या भट डॉ. अभय को कावेडिया आणि इतर डॉक्टरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
























































