
कोविडकाळातदेखील स्वच्छतेची जबाबदारी गांभीर्याने पार पाडणाऱया सफाईमित्रांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले आहे. महात्मा गांधी जयंतीनिमित्त दिलेल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात की, आज महात्मा गांधी यांची जयंती आहे. आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवदेखील साजरा करीत आहोत. हे औचित्य दाखवून आपण स्वच्छतेचे काम गांभीर्याने पार पाडणाऱया फ्रंट लाइनर्स सफाईमित्रांचादेखील सन्मान करीत आहोत. ही त्यांचे मनोबल वाढवणारी गोष्ट आहे.
दोन वर्षांपासून या कोरोनाच्या कठीण परिस्थितीतदेखील सफाई कर्मचाऱयांनी स्वच्छतेचे काम अतिशय प्रामाणिकपणे आणि मेहनतीने तसेच जबाबदारीने पार पाडले हे प्रशंसनीय आहे. नगर विकास विभागाने त्यांचे कौतुक करायचे ठरवले ते योग्य आहे. अशा कर्मचाऱयांमुळे स्वच्छतेला प्रोत्साहन मिळते आणि शहराचे तसेच नागरिकांचे आरोग्य ठीक राहण्यास मदत होते. या सफाईमित्रांचे कौतुक करावे तितके कमी आहे. कोविडविरुद्धच्या लढाईमध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.



























































