एका महिन्यात पैसे झाले दुप्पट ; सप्टेंबर महिन्यात ‘या’ शेअरने गुंतवणूकदार मालामाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेअर बाजारात सध्या तेजी आहे. सप्टेंबर महिना शेअर बाजारासाठी चांगला ठरला आहे. या महिन्यात मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने ऐतिहासिक 60 हजाराचा टप्पा पार केला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 17,900 पर्यंत पोहचला आहे. तसेच या महिन्यात काही शेअरने जबरदस्त कामगिरी करत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

सप्टेंबर महिन्यात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या शेअरमध्ये वोडाफोन आयडिया अव्वलस्थानी आहे. या शेअरने सप्टेंबर महिन्यात गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या शेअरने सप्टेंबर महिन्यात 100 टक्के रिटर्न दिले आहेत. या महिन्यात गुंतवणूकदारांनाचे पैसे दुप्पट झाले आहेत.

वोडाफोन आयडियाचा शेअर दर 31 ऑगस्ट 2021 रोजी 6.10 रुपये होता. तो एका महिन्याने 30 सप्टेंबर 2021 रोजी 11.90 रुपये झाला होता. तसेच या दिवशी या शेअरने 12 रुपयापर्यंत मजल मारली होती. त्यामुळे या शेअरमध्ये गुतंवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे पैसे महिन्याभरात दुप्पट झाले आहेत.

कंपनीच्या प्रवर्तकांनी गुंतवणुकीची केलेली घोषणा आणि केंद्र सरकारने एजीआर भरण्यासाठी 4 वर्षांची दिलेली मुदत यामुळे या शेअरमध्ये जबरदस्त तेजी आली. गेल्या वर्षी हा शेअर 4.55 रुपयांपर्यंत खाली घसरला होता. तो आता 12 रुपयांपर्यंत पोहचला आहे.

वोडाफोन आयडियाप्रमाणे डिश टीव्हीच्या शेअरमध्येही सप्टेंबरमध्ये तेजी दिसून आली. या महिन्यात या शेअरने 63 टक्के रिटर्न दिले आहेत. 31 ऑगस्ट 2021 रोजी हा शेअर 12.60 रुपयावर होता. तर 30 सप्टेंबरला तो 20.50 रुपयांपर्यंत पोहचला होता. तसेच गेल्या सहा महिन्यात या शेअरने 100 टक्के रिटर्न दिले आहेत.