
सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘हनीट्रॅप’मध्ये अडकलेल्या यंत्रमाग कामगाराने संबंधित तरुणीकडून होणाऱ्या पैशाच्या मागणीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या आत्महत्येची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली असून, यासंदर्भात खात्री करण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी दिली.
संतोष निकम (वय 32, रा. शाहूनगर, चंदूर, ता. हातकणंगले) असे या कामगाराचे नाव आहे. ‘हनीट्रॅप’मधून होणाऱ्या खंडणीचे प्रकार जिल्ह्यात गेल्या सुरू आहे. असाच प्रकार संतोष निकम या यंत्रमाग कामगारासोबत घडल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासातही यासंदर्भात काही गोष्टी समोर येत आहेत. या घटनेने ‘हनीट्रॅप’च्या विळख्यात अडकलेल्या तरुणांमध्ये खळबळ उडाली आहे.
विवाहित असलेल्या संतोषने शनिवारी रात्री घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करताना त्याचा मोबाईल तपासला असता ‘हनीट्रॅप’चा हा प्रकार निदर्शनास आल्याची चर्चा होऊ लागली आहे. एका तरुणीसोबत ऑनलाइन चॅटिंग होऊन त्या तरुणीने संतोषलाही व्हिडीओ कॉलद्वारे अश्लील हावभाव करावयास लावले. त्यानंतर हा व्हिडीओ सार्वजनिक करण्याची धमकी देत संतोषकडून काही रक्कम मागण्यात आली. त्यामुळे फसवणूक झाल्याची जाणीव होताच गळफास घेऊन संतोषने आत्महत्या केली.




























































