
आचरा मालवण मार्गावर आचरा हायस्कूल समोर रविवार रात्री उशिरा भीषण अपघात घडला. या अपघातात पालघर येथील पोलीस उपनिरीक्षक दीपक पुरुषोत्तम लोणे (वय 47, रा. आचरा वरचीवाडी) व जमेंदर प्रसाद (वय 50, रा. आचरा वरचीवाडी) या दोघांचा कणकवली येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबत माहिती आचरा पोलिसांनी सोमवारी दुपारी दिली आहे.
दीपक लोणे हे पालघर जिल्ह्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेत आहेत. सुट्टीवर ते आचरा येथे आले होते. आपली मुलगी परी (वय 17) व सहकारी जमेंदर प्रसाद यांच्यासोबत रविवारी रात्री हॉटेलमध्ये जेवण करून चालत घरी निघाले होते.
याचवेळी पाठीमागून आलेल्या कारने तिघांना धडक दिली. अपघातानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिन्ही जखमींना ग्रामस्थ व पोलिस यांनी आचरा येथे प्राथमिक उपचारानंतर कणकवली येथील रुग्णालयात दाखल केले. दरम्यान दीपक व जमेंदर यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान, या अपघात प्रकरणी कार चालक कृष्णा राणे (वय 60, रा जाणवली, कणकवली) याच्या विरोधात आचरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धडक देणारी कार व कार चालक यांना आचरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आचरा पोलीस करत आहेत.




























































