नवरात्रीला ‘श्री सुक्तम’ची भेट, सुमन एंटरटेनमेंटने केली निर्मीती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवरात्रोत्सवाची सर्व जण आतुरतेने वाट पाहतायत. भाविकांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी दरवर्षी अंबामातेची महती सांगणारी अनेक भक्तिमय गाणी ऑडिओ, व्हिडीओ स्वरूपात भाविकांच्या भेटीला येतात. त्यात सगळय़ांचे लक्ष वेधलेय ते सुमन एंटरटेन्मेंटच्या ‘श्री सुक्तम’ने. नुकताच हा व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यात ‘अग्गंबाई सूनबाई’ फेम अभिनेत्री उमा पेंढारकर श्री सुक्तम मंत्राचा जप करताना दिसणार आहे.

‘देवा गणराया’ या गाण्याला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर सुमन एंटरटेन्मेंटचे हे दुसरे पुष्प. केदार जोशी निर्मित या व्हिडीओचे दिग्दर्शन संकेत सावंत यांनी केले आहे, तर श्लोकपठण गायिका आनंदी जोशी यांनी केले आहे. मराठीतील आघाडीची संगीतकार जोडी चिनार-महेशने ते संगीतबद्ध केले आहे. याबाबत निर्माते केदार जोशी म्हणाले, हे गाणं नसून भक्तिमय जप आहे. श्री सुक्त मंत्र पठणाचे अनेक फायदे आहेत. लक्ष्मीचं वरदान देणारा, आत्मशांती देणारा हा जप आहे. यानिमित्ताने भाविकांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो ही देवी चरणी प्रार्थना!