
नाशिकमध्ये आयोजित 83व्या राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत 19 वर्षांखालील मुलींच्या गटात नाशिकची तनिषा कोटेचा व मुलांमध्ये जश मोदीने विजेतेपद मिळविले, तर 21 वर्षांखालील मुलांच्या गटात मुंबईचा ए. रेगन व मुलींमध्ये रिशा मिरचंदानी अव्वल ठरले.
तनिषा कोटेचाने पुण्याच्या पृथा वर्टीकरचा चुरशीच्या लढतीत पराभव केला. दुसरी मानांकित नाशिकची सायली वाणी हिने विधी शहाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. नाशिकच्या दोन्ही खेळाडूंमध्ये झालेल्या अंतिम लढतीत तनिषाने 4-1ने सायलीचा पराभव करून सुवर्णपदकावर नाव कोरले. मुलांच्या गटात जश मोदीने प्रथम मानांकित ठाण्याच्या दिपीत पाटीलचा 4-2 असा पराभव केला. अंतिम सामना जश व कुशल चोपडा यांच्यात रंगला. त्यात जशने 4-1 असा विजय मिळविला. 21 वर्षांखालील गटातील प्रथम मानांकित ए. रेगनने अक्षय पिसाळचा 4-1ने पराभव करून अंतिम फेरी गाठली. जितेंद्र यादवचाही 4-1 नेच पराभव करून रेगन सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. मुलींच्या गटात मुंबईच्या रीशा मिरचंदानीने ठाण्याच्या आर्या संगडेकरचा 4-1ने पराभव केला. अंतिम सामन्यात ठाण्याच्या ईशा चव्हाणवर 4-0 असा विजय मिळविला. 21 वर्षांखालील मुले व मुली दोन्ही गटाचे विजेतेपद मुंबईच्या सबर्बन टेबल टेनिस असोसिएशनच्या खेळाडूंनी मिळविले आहे.
राज्य टेबल टेनिस संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. शिवाजी सरोदे यांच्या हस्ते सोमवारी बक्षीस वितरण पार पडले. राष्ट्रीय टेबल टेनिसपटू राजा वर्टी, नंदू दामले यांना गौरविण्यात आले. यावेळी संघटनेचे यतिन टिपणीस, सुभाष देसाई, श्रीराम कोणकर, जिल्हा संघटनेचे नरेंद्र छाजेड, भूषण पटवर्धन, नितिन मुलतानी, यतिन टिपणीस, विभागीय सहनिबंधक सी. आर. शहा, प्रकाश केळकर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी नाशिक जिमखाना व विश्वास बँकेचे मोलाचे सहकार्य लाभले.

























































