ऐतिहासिक क्षण! मलेरियाचीही लस आली! लहान मुलांना डोस देण्यास डब्ल्यूएचओची मान्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मलेरियाच्या गंभीर आव्हानाला सामोरे जाण्यासाठी जगाला एक भक्कम शस्त्र हाती लाभले आहे. कोरोना लसीप्रमाणेच आता मलेरिया प्रतिबंधक लस आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जगातील पहिल्या मलेरिया लसीला मान्यता दिली असून त्यानुसार लहान मुलांना या लसीचा डोस दिला जाणार आहे. ही लस दररोज हजारो मुलांचे प्राण वाचवेल, असे जाहीर करतानाच ‘आज ऐतिहासिक दिवस आहे’, अशी प्रतिक्रिया डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधोनाम घेब्रेयेसस यांनी बुधवारी दिली.

संपूर्ण जग 2025 पर्यंत मलेरियामुक्त करण्याचे उद्दिष्ट डोळय़ासमोर ठेवून डब्ल्यूएचओकडून त्याच दिशेने प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून डब्ल्यूएचओने जगातील पहिल्या मलेरिया लसीचा लहान मुलांसाठी वापर करण्यास मान्यता दिली आहे. घेब्रेयेसस यांनी बुधवारी ही ऐतिहासिक घोषणा करीत संपूर्ण जगाला मोठा दिलासा दिला. डब्ल्यूएचओच्या पुढाकाराने 25 देशांमध्ये मलेरिया निर्मूलनाचे मोठे अभियान राबवले जात आहे.

z मलेरियामुळे जगभरात लाखो निष्पाप मुलांना प्राण गमवावे लागतात. इतर देशांच्या तुलनेत आफ्रिकन देशांमध्ये मलेरियाच्या साथीचा सर्वाधिक कहर सुरू असतो. प्रत्येक वर्षाला जवळपास 2 लाख 60 हजारांहून अधिक आफ्रिकन मुलांना मलेरिया आजारामुळे जीव गमवावा लागतो. जगभरात दरवर्षी 4 लाखांहून अधिक मलेरिया बळींची नोंद होते.

हा ऐतिहासिक क्षण आहे. लहान मुलांसाठी मलेरिया लसीची दीर्घकाळापासून प्रतीक्षा केली जात होती. त्यामुळे मलेरिया लसीची मान्यता ही मोठे यश आहे. मलेरियापासून मुलांचे संरक्षण करण्यात ही लस सर्वात उपयोगी साधन ठरेल. लसीमुळे प्रत्येक वर्षाला हजारो मुलांचे जीवन वाचू शकेल.
z टेड्रोस घेब्रेयेसस, महासंचालक, डब्ल्यूएचओ.