दीपक चहरची भर मैदानात प्रेयसीला लग्नाची मागणी, बोटात अंगठी घालत प्रेक्षकांच्या साक्षीने साखरपुडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज दीपक चहर याने गुरुवारी पंजाब किंग्जविरुद्धचा सामना संपल्यानंतर मैदानावर उपस्थित असलेल्या प्रेयसीला फिल्मी स्टाईलमध्ये मागणी घातली. प्रेयसीने होकार देताच दीपकने तिच्या बोटात अंगठी घालत प्रेक्षकांच्या साक्षीने साखरपुडाही उरकून घेतला.

पंजाब किंग्जविरुद्धचा सामना चेन्नई सुपर किंग्जने 6 विकेट्स गमावला. चेन्नईचा पराभव झाला असला तरी वेगवान गोलंदाज दीपक चहर याने मात्र प्रेयसीला जिंकले. सामना संपताच दीपक प्रेक्षक गॅलरीमध्ये बसलेल्या प्रेयसीजवळ गेला आणि गुडघ्यावर बसून त्याने तिला मागणी घातली. प्रेयसीनेही होकार देताच दीपकने तिच्या उजव्या हाताच्या बोटात अंगठी घातली. यावेळी उपस्थित खेळाडूंनी आणि प्रेक्षकांनीही टाळ्या वाजवून दोघांचे अभिनंदन केले.

कोण आहे दीपकची प्रेयसी?

दीपक चहर याने लग्नाची मागणी घातलेली तरुणी कोणी विदेशी नाही तर हिंदुस्थानी आहे. तिचे नाव जया भारद्वाज आहे. बिग बॉस फेम सिद्धार्थ भारद्वाज याची ती बहीण आहे. सिद्धार्थ याने दीपक आणि जया यांच्या साखरपुड्याचे खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

deepak

चेन्नईचा पराभव

तत्पूर्वी चेन्नई सुपर किंग्जने विजयासाठी दिलेले 135 धावांचे आव्हान पंजाबने 13 षटकांमध्ये 4 गडी गमावून पूर्ण केले. पंजाबचा कर्णधार के.एल. राहुल याने नाबाद 98 धावांची खेळी केली.

चेन्नईचा स्टार गोलंदाज

दीपक चहर हा चेन्नई सुपर किंग्जचा स्टार गोलंदाज आहे. आयपीएल 2021 मध्ये त्याने 13 लढतीत 13 बळी मिळवले आहे. तसेच आयपीएलच्या एकूण कारकिर्दीत त्याच्या नावावर 58 बळींची नोंद आहे. चहर 2016 पासून चेन्नई सुपर किंग्जचा सदस्य आहे. त्याने हिंदुस्थानच्या संघाकडूनही आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले आहेत.