श्री अंबाबाई मंदिरात बॉम्बची अफवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मंदिरे उघडल्याने भाविक समाधानाने दर्शन करत असतानाच एका अज्ञाताने यामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न केला. करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पूजेच्या ठिकाणी बॉम्ब असल्याचा निनावी फोन करून, भाविकांसह पोलिसांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी तातडीने धाव घेत तपासणी केली असता ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. तासाभराने पुन्हा भाविकांना सुरळीत दर्शन घेण्यासाठी सोडण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वेळा मंदिरे बंद करावी लागली होती. कोरोना संसर्गाचा जोर कमी होताच नवरात्रोत्सवापासून विशेष खबरदारी घेऊन सर्व प्रार्थनास्थळे सुरू करण्यात आली. मंदिरे उघडल्याने सकाळपासून श्रीअंबाबाई मंदिरातही ई-पासधारक भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. सर्वत्र उत्साह व चैतन्यमय वातावरण असतानाच सायंकाळी चारच्या सुमारास करवीरनिवासिनी श्रीअंबाबाई मंदिरात पूजेच्या ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती अज्ञाताने पोलीस मुख्यालयात दिली. घटनेची वरिष्ठ स्तरावर गांभीर्याने दखल घेत पोलिसांची बॉम्बशोधक व डॉग स्कॉड पथके ताबडतोब मंदिराकडे रवाना करण्यात आली. यावेळी तातडीने मंदिर परिसर मोकळा करण्यात आला. दर्शनरांगेपासून भाविकांना दूर करण्यात आले. शोधपथकामुळे तब्बल दीड तास भाविकांना मंदिरात सोडण्यात आले नाही.

सर्वत्र कसून तपासणी केल्यानंतर संशयास्पद काहीच वस्तू आढळून आल्या नाहीत. खात्री करून भाविकांसाठी दर्शनरांगा सुरळीत करण्यात आल्या. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, शहर पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे हेसुद्धा मंदिरात दाखल झाले. निनावी दूरध्वनीमुळे पहिल्याच दिवशी सुरक्षा यंत्रणेची तारांबळ उडाली होती.