
महानगरपालिकेतील कर्मचारी, कामगारांनी पालिकेचे काम करणे अपेक्षित आहे. मात्र, चंद्रपूर पालिकेचे सफाई कामगार वाळू उचलण्याचे खासगी काम करताना येथील रामनगर परिसरात आढळून आले. त्यामुळे काही नागरिकांनी संबंधित कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता सभापतींनी हे काम सांगितल्याची कबुली त्यांनी दिली. त्यावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शहरातील रामनगर परिसरातील मेडिकल कॉलेज जवळील रोडवर मागील काही दिवसांपासून वाळू टाकण्यात येत होती. सकाळच्या सुमारास मनपाचे काही कामगार हातगाडीने वाळू उचलण्याचे काम करीत होते. मनपाचे स्थायी समिती अध्यक्षांच्या घरासमोर वाळू टाकत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांना मिळाली. नागरिकांनी मनपाच्या कामगारांना याबाबत विचारणा केली असता हे काम सभापतींनी सांगितल्याचे त्यांनी सांगितले. मनपाचे कर्मचारी सभापतींच्या घरचे काम करण्यासाठी आहेत का, असा सवाल शहरातील नागरिकांनी केला आहे . महानगर पालिकेत भाजपची सत्ता आहे. विशेष म्हणजे सभापती रामनगर परिसरातील भाजपचे नगरसेवक आहे. भाजप नगर सेवकांकडून मनपा कामगारांना अशी वागणूक मिळत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. मनपाच्या कामगारांना खासगी कामे सांगण्यात येत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.




























































