लसीकरण झालेल्यांनाच सोलापूर महापालिकेत प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिकेतील कर्मचारी व कामानिमित्त येणाऱ्य़ा नागरिकांना लसीकरण सक्तीचे करण्यात आले आहे. लस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखविल्यानंतरच महापालिकेत प्रवेश मिळणार आहे. लसीचा एकही डोस न घेतल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करून महापालिका परिसरात लसीकरणाची सोय करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली.

सोलापूर शहरातील 42 टक्के नागरिकांनी अद्याप लसीचा एकही डोस घेतलेला नाही. दोन डोस घेऊन सुरक्षित झालेल्या नागरिकांची संख्या केवळ 25 टक्के आहे. शासनाकडून मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध झाली आहे. महापालिका आरोग्य विभागाने लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, खासगी हॉस्पिटल आदींच्यामार्फत लसीकरण केंद्रांची संख्या वाढवून लसीकरण मोहिमेची गती वाढविण्यासाठी प्रयत्न केले. तरीदेखील लसीकरणाला नागरिकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. आता ‘मिशन कवचकुंडल’अंतर्गत सोलापूर शहरातील व्यापारी संकुले, खासगी आस्थापनातील कर्मचाऱ्य़ांची आरोग्य पथकामार्फत तपासणी होत आहे. लस न घेतलेल्यांवर दंडात्मक कारवाई करून त्यांचे लसीकरण करण्यात येत आहे.

याच पद्धतीने महापालिकेतील कर्मचारी व विविध कामानिमित्त येणाऱ्य़ा नागरिकांनादेखील लसीकरण सक्तीचे राहणार आहे. लसीचे प्रमाणपत्र पाहूनच महापालिका प्रवेशद्वारातून प्रवेश देण्यात येईल, असेही पांडे यांनी सांगितले.