
बॉलीवूडमधलं सर्वात क्युट कपल म्हणून ओळखले जाणारे अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा यांनी नुकतीच ‘कौन बनेगा करोडपती-13’ मध्ये हजेरी लावली होती. यावेळी या जोडीने बिग बी यांना एक स्पेशल गिफ्ट दिले आहे. रितेश आणि जेनेलियाने इमॅजिन मीट्स या नावाने व्यवसाय सुरू केला आहे. हे प्लान्ट बेस्ड मीट आहे. म्हणजेच हा जरी मांसाहारी पदार्थ वाटत असला तरीदेखील प्रत्यक्षात तो शाकाहारी पदार्थ असतो. केवळ त्याला मांसाहारी पदार्थाचे रूप दिले जाते. प्लान्ट बेस्ड मीट प्रॉडक्शनमध्ये पालेभाज्या किंवा अन्य शाकाहारी पदार्थ मांसाप्रमाणे भासतील या पद्धतीने तयार केले जातात. या उत्पादनांचे विशेष गिफ्ट हॅम्पर या वेळी या जोडीने बिग बी यांना दिले. अमिताभ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या उपक्रमाचे कौतुक केले आहे तसेच रितेशने अवयवदान करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरीर निरोगी ठेवण्यासाठी मांसाहार पूर्णपणे बंद केले आहे, या निर्णयाबद्दलदेखील बिग बी यांनी रितेशचे कौतुक केले.
























































