
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी सुरू केलेल्या ‘प्रबोधन’ या नियतकालिकाचे शताब्दी वर्ष सुरू आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामी वैचारिक जडणघडणीत ‘प्रबोधन’चे महत्त्वपूर्ण योगदान आहे. प्रबोधनकारांच्या विचारांचा समृद्ध वसा आणि जतन करण्यासाठी तसेच हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने ‘प्रबोधन’मधील प्रबोधनकार हा त्रिखंडात्मक संपादित ग्रंथ साकारला आहे. या ग्रंथाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 रोजी सायंकाळी 6 वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे.
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी 16 ऑक्टोबर 1921 रोजी ‘प्रबोधन’चा पहिला अंक प्रसिद्ध केला. ‘प्रबोधन’ या नियतकालिकाने संपूर्ण महाराष्ट्रात समाजसुधारणेचे नवे वारे निर्माण केले आणि महाराष्ट्राला वैचारिक समृद्धी दिली. ‘प्रबोधन’चे 16 ऑक्टोबर 2020 ते 15 ऑक्टोबर 2021 हे शताब्दी वर्ष राज्य शासनाच्या वतीने विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरे करण्यात येत आहे. याअंतर्गत ‘प्रबोधन’मधील प्रबोधनकार-‘प्रबोधन’ नियतकालिकातील केशव सीताराम ठाकरे यांचे लेख हा त्रिखंडात्मक संपादित ग्रंथ प्रकाशित करण्यात येत आहे. ग्रंथाचे संपादन सचिन परब, डॉ. रणधीर शिंदे, ज्ञानेश महाराव, सुनील कर्णिक व विश्वंभर चौधरी यांनी केले आहे. प्रबोधनकारांची विचारसंपदा पुन्हा एकदा या संपादित ग्रंथाच्या माध्यमातून वाचकांसमोर येणार आहे.
‘प्रबोधन’मधील प्रबोधनकार या ग्रंथाच्या तीन खंडांत ऑक्टोबर 1921 ते मार्च 1930 या कालावधीत प्रकाशित झालेले ‘प्रबोधन’ या नियतकालिकाचे 91 अंक अंतर्भूत करण्यात आले आहेत.



























































