वर्गातील उपस्थितीसाठी शाळा-कॉलेजांची विद्यार्थ्यांवर जबरदस्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

4 ऑक्टोबरपासून राज्यातील ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असून आता वर्गातील उपस्थितीसाठी शाळा-कॉलेजांकडून विद्यार्थ्यांवर जबरदस्ती होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. शाळा सुरू करताना शालेय शिक्षण विभागाने ऑनलाइन वर्गदेखील सुरू ठेवण्याच्या सूचना शाळांना दिल्या होत्या. मात्र बहुसंख्य शाळा ऑनलाइन शिक्षणात अडचणी येत असल्याचे कारण पुढे करून विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यास सांगत आहेत.

कोरोना प्रतिबंधक सोशल डिस्टन्सिंगमुळे एका बाकावर एकच विद्यार्थी बसत असल्याने एक तुकडी दोन वर्गात विभागली गेली आहे. त्यामुळे शिक्षकांना एक धडा दोन वेळा वर्गात शिकवावा लागत आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी ऑनलाइन लेक्चरला हजेरी लावतात त्यांच्यासाठी ऑनलाइन वर्गही घ्यावे लागत आहेत. यामुळे सध्या शिक्षकांची प्रचंड तारांबळ उडत आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी शाळेत आले तर शाळांचा ऑनलाइन शिक्षणावरील ताण कमी होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांवर वर्गात उपस्थित राहण्याची सक्ती सुरू आहे.

ऑफलाइन वर्गाचा विद्यार्थ्यांनाच फायदा

ऑफलाइन वर्गांना उपस्थित राहिल्यास त्याचा फायदा विद्यार्थ्यांनाच होणार आहे, असे शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांनी सांगितले. नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांची विज्ञान विषयाची प्रॅक्टिकल्स ऑफलाइन वर्गात शिकविल्यास ती विद्यार्थ्यांना जास्त चांगल्या पद्धतीने समजू शकतात. ऑनलाइन वर्गात विद्यार्थ्यांना बऱयाच कन्सेप्ट क्लिअर होत नाहीत. जे विद्यार्थी ऑफलाइन वर्गात येत आहेत ते अभ्यासात पुढे जात असल्याचे निदर्शनास आले आहेत. तर ऑनलाइन वर्गात असलेले विद्यार्थी लिखाणात मागे पडले आहेत. त्यांच्या अभ्यासाचे तासही कमी झाले असल्याचेही मोरे यांनी स्पष्ट केले. शिवाय शिक्षण विभागानेच वर्गातील उपस्थितीचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना दिल्या असल्याने शाळांकडून विद्यार्थ्यांना ऑफलाइन वर्गात हजर राहण्यास सांगण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.

ऑनलाइन शिक्षणाबाबत नव्या मार्गदर्शक सूचना

विविध कारणांमुळे शाळेत उपस्थित राहू न शकणाऱया विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) लवकरच नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर करणार आहेत. ऑनलाइन शिक्षण घेणारे विद्यार्थी अभ्यासात मागे पाडू नयेत यासाठी शाळांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शहरी भागात मोठय़ा प्रमाणावर पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास नकार दिला आहे. या मुलांसाठी ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर घरी राहणाऱया विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी एससीईआरटीकडून विविध तंत्रज्ञानाचा आधार घेत त्यासाठीचा कार्यक्रम, नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या जाणार आहेत.

मुंबईतील काही ज्युनियर कॉलेज पालकांच्या परवानगीशिवाय विद्यार्थ्यांवर वर्गात उपस्थित राहण्यासाठी सक्ती करीत आहेत. अकरावी ऑनलाइन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांवरही ओरिएंटेशन प्रोग्रॅमसाठी हजेरी सक्तीची असल्याचे काही कॉलेजांकडून सांगण्यात येत आहे. ही बाब गंभीर असून शिक्षण विभागाने अशा शाळा-कॉलेजांवर कारवाई केली पाहिजे.
– अॅड. अनुभा सहाय, अध्यक्ष, इंडिया वाईड पॅरेंट्स असोसिएशन