
>> डॉ. मंजिरी भालेराव
त्रिमूर्तींपैकी अत्यंत महत्त्वाचा देव म्हणून उदयाला आलेला देव म्हणजे विष्णू. हिंदुस्थानी परंपरेत सृष्टीचे पालकत्व आलेला विष्णू विविध अवतारांच्या रूपात प्रचंड लोकप्रिय ठरला.
सर्व देवांच्या वर स्थान असलेल्या विष्णूचे अस्तित्व वैदिक काळापासून दिसते. वैदिक धर्म हा यज्ञ या स्वरूपात असला तरी वैदिक साहित्यात अनेक लहानमोठय़ा देवतांचे उल्लेख पाहायला मिळतात. त्यामध्ये विष्णूही आहे, परंतु इतर देवतांच्या मानाने तिथे विष्णू हा एक छोटा देव होता असे दिसते. त्याचा उल्लेख फक्त सहा सूक्तांमध्ये आलेला दिसतो. पुढे काळाच्या ओघात तो अतिशय महत्त्वाचा देव बनला.
वैदिक काळात विष्णू आणि सूर्य यांचे संकल्पनात्मक एकरूपत्व असावे असे वाटते. तिथे विष्णू म्हणजे पक्षी स्वरूपातील सूर्य असेच मानले गेले आहे. विष्णूच्या काही नावांमधून ते लक्षात येते. सुपर्ण आणि गुरुत्मान् ही नावे सूर्याची आहेत, पण विष्णुसहस्रनामात विष्णूचेही नाव सुपर्ण आहे. त्रिविक्रम, उरुगाय (विस्तीर्ण गती असलेला), उरुक्रम (विस्तीर्ण पदक्षेप करणारा) विशेषणे मूळची सूर्याची आहेत. पुढे ती विष्णूशी संबंधित होतात हे लक्षात येते.
काळाच्या ओघात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींपैकी तो एक अत्यंत महत्त्वाचा देव म्हणून उदयाला आलेला दिसतो. या सृष्टीचे पालकत्व त्याच्याकडे आले तसेच इथल्या जनतेचेही पालकत्व त्याच्याकडे आलेले दिसते. त्यामुळे जो भक्त संकटात असताना विष्णूचा धावा करतो, त्याला तो नक्की वाचवतो ही श्रद्धा विकसित झालेली दिसते. त्यामधूनच दुष्ट शक्तींपासून भक्तांचे तो नेहमी रक्षण करतो आणि त्यासाठी वेळप्रसंगी विविध अवतारही घेतो असा समज दृढ झाला. त्यातूनच पुढे अवतार ही संकल्पना विकसित होऊन त्याच्या निरनिराळ्या अवतारांच्या कथा निर्माण झाल्या. विविध पुराणांत वेगवेगळ्या संख्येंचे अवतार दिसतात. शेवटी ते दहा या संख्येवर स्थिर झाले. त्या कथांची लोकप्रियता प्रचंड मोठय़ा प्रमाणावर वाढली आणि त्यांचे चित्रण शिल्पांमध्ये आणि चित्रांमध्ये होऊ लागले. या गोष्टीला बराच काळ लागला, पण हा प्रवास पौराणिक साहित्यात स्पष्ट दिसतो. त्यातच भगवद्गीतेतील वचनाची भर पडली-
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे।।
इ.स.च्या पहिल्या शतकात त्याचे अशा प्रकारचा तारक देव किंवा त्राता देव हे रूप झपाटय़ाने लोकप्रिय झाले, पण याआधीच इ.स.पूर्व दुसऱया शतकात त्याचे मूर्तिरूपातील अंकन वायव्य हिंदुस्थानातील इंडो-ग्रीक राजा अगाथोक्लेस याच्या नाण्यावर झालेले आढळते. नाण्याच्या एका बाजूला हातात नांगर घेतलेला बलराम तर दुसऱया बाजूला हातात चक्र आणि शंख घेतलेला विष्णू (कृष्ण) दाखवला आहे. अशा प्रकारचे कोणत्याही वैदिक देवतेचे मानवी रूपात केलेलं हे हिंदुस्थानातील सर्वात पहिले अंकन म्हणायला हरकत नाही, पण जर इ.स.पूर्व दुसऱया शतकात या देवतेच्या मानवी रूपात अंकन होत असेल तर त्याच्या कितीतरी वर्षे आधी या देवतांचे रूप आणि मूर्तिशास्त्र पक्के झाले असावे. त्यांचे पुरावे आज शिल्लक नाहीत मात्र धातूच्या नाण्यावर त्यांचे अंकन आढळते. ही नाणी दोन लिपी (ग्रीक आणि ब्राह्मी) आणि दोन भाषांमध्ये (ग्रीक आणि प्राकृत) लेख असल्यामुळेसुद्धा प्रसिद्ध आणि महत्त्वाची आहेत. इंडो–ग्रीक राजांनी त्यांच्या नाण्यांवर हिंदुस्थानी देवांचे अंकन करावे ही गोष्टसुद्धा विशेष आहे. एकतर त्यांच्या राज्यातील प्रजेचे हे आराध्य दैवत असावे किंवा तो राजाच या देवतेचा भक्त असावा असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
असाच एक खूप महत्त्वाचा पुरावा मध्य प्रदेशातील विदिशा या गावातून पुढे आला आहे. या ठिकाणी असलेल्या एका स्तंभावर ब्राह्मी लिपी आणि प्राकृत भाषेत एक लेख लिहिलेला सापडला. तक्षशिलेचा राजा अन्तिआलकिडस याचा राजदूत हेलिओडोरास हा विदिषेचा राजा भागभद्र याच्या दरबारात आलेला होता. तेव्हा त्याने तिथे एक विष्णूचे मंदिर होते. त्याच्या समोर एक गरुडस्तंभ उभारला आणि त्यावर हा लेख लिहून ठेवला. त्यात स्वतःची सगळी माहिती दिली. तसेच हे कार्य केल्याबद्दल जे पुण्य मिळेल ते आपल्या आईवडील यांना मिळावे असेही त्यात लिहिले आहे. यावरून काही अतिशय महत्त्वाच्या गोष्टी दिसतात. त्यापैकी एक म्हणजे इ.स.पूर्व दुसऱया शतकात विष्णूचे मंदिर बांधले होते आणि त्यात मूर्ती होती. अशा प्रकारचा मूर्तिपूजेचा आणि मंदिर स्थापत्याचा हा सर्वात प्राचीन भौतिक पुरावा पाहायला मिळतो.
यावरून असे लक्षात येते की, इ.स.पूर्व दुसऱया शतकात विष्णू हा देव वायव्य भागात अतिशय लोकप्रिय होता. त्याच्या पुष्कळ मूर्ती आणि मंदिरे तयार होत असावीत. या देवाने पुढे हिंदुस्थानभर विविध अवतारांच्या रूपात मोठा संचार केला आणि एक अत्यंत महत्त्वाचा देव बनला. त्याच्या उपासनेचे हे लिखित आणि भौतिक पुरावे त्याच्या प्राचीन काळातील लोकप्रियतेचे साक्षीदार आहेत.




























































