
>> सुधाकर वसईकर
काही वर्षांपूर्वी टाटा ट्रस्टने ‘I, my self and my trust’ या शीर्षकांतर्गत आपल्या कर्मचाऱ्यांसाठी स्पर्धा घेतली. सदर स्पर्धेत परेश जयश्री मनोहर यांनी स्थलांतरित ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी सादर केलेल्या ‘शिक्षण हमीपत्र’ या संकल्पनेस अंतिम स्थान मिळाले. यातूनच ‘आमचा शिक्षण हक्क : आमचा अधिकार’ या घोषवाक्याचे इंग्रजी आद्याक्षर घेऊन ‘ASHAA’ नावाचा ‘डिजिटल एज्युकेशन गॅरंटी कार्ड’ हा ‘शिक्षण हमीपत्र’ प्रकल्प शालेय शिक्षण विभाग व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आकारास आला.
हा प्रकल्प राबविण्यासाठी पुण्यातील सोमेश्वर साखर कारखाना निवडण्यात आला. कारखान्याच्या परिक्षेत्रात सातत्याने ऊसतोडणी कामगारांचे तळ पडत असतात. त्यातील 25 गावं या प्रकल्पासाठी निवडली गेली. स्थलांतरित ऊसतोडणी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडत असतो. तळावरील कोप्यात जाऊन गाव कार्यकर्त्यांनी ऊसतोडणी कामगारांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कोयता मजुरी हे जगण्याचं समीकरण बनल्याने संपूर्ण कुटुंबच ऊसतोडणीच्या दावणीला कसं बांधलं जातं याचं गणित शिक्षणापेक्षा पोटाशी जोडलं गेल्याचं कळलं. नोकरी न मिळालेले डीएड, बीएड केलेले असंख्य तरुणदेखील ऊस तोडायला येतात. त्यामुळे आणखीच शिक्षणाविषयी अनास्था पसरलीय. म्हणूनच ते शिक्षणापेक्षा पोटापाण्याच्या ज्ञान कौशल्याला अर्थात कोयत्याला अधिक महत्त्व देताना दिसतात.
असुरक्षिततेची भावना, अपघात, ज्या हाती पाटी पेन्सिल, पुस्तक असायला हवे असे कोवळे हात, लहान भावंड आणि पशुधन सांभाळत असतात. अंतर्गत स्थलांतर मानसिक ताणतणावाचे ठरते. मुलींची पाळी, आरोग्य सुविधांची वानवा, शाळा ते तळाचे अंतर, अवचित येणारा अवकाळी पाऊस आदी समस्यांची परिणती पालकांची, मुलांची इच्छा असूनही ही मुले शिक्षणापासून दूर फेकली जाण्यात होते. समस्यांच्या दुष्टचक्रात अडकून त्यांची शिक्षणकोंडी होते.
वंचित मुलांसाठी तुटपुंज्या मानधनावर अहोरात्र झटणाऱ्या गाव कार्यकर्त्यांनी ग्रामस्थाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना सुरुवातीला दमदाटीही सहन करावी लागली, मात्र काहींना आश्वासक अनुभवदेखील आलेत. अर्थात गुरुजी, शिक्षणप्रेमी मुकादम, हौसाबाई ही सुजाण माणसंही भेटलीत. याच मानसिकतेचा आधार घेऊन हे कार्यकर्ते मुलांचंही समुपदेशन करतात. व्यवहारी ज्ञान, मैदानी खेळ, गप्पागोष्टी, गाणी आदी सांस्कृतिक कार्यक्रम राबवून त्यांचं प्रबोधन केलं जातं. यादरम्यान त्यांना आलेले संमिश्र अनुभव त्यांनी आपल्या रोजनिशीत लिहून ठेवलेत ते अत्यंत दाहक आहेत, मन सुन्न करणारे आहेत.
या अनुभवांना परेश जयश्री मनोहर आणि संतोष शेंडकर यांनी शब्दरूप देऊन त्याचं संकलन आणि संपादन केलंय. छोटेखानी 40 प्रकरणाचं रोहन प्रकाशनाने ‘शिक्षणकोंडी’ पुस्तक प्रकाशित केलंय. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी उद्बोधक तळटीपद्वारे महत्त्वाच्या बाबींवर सारांश रूपाने प्रकाश टाकण्यात आला आहे. गोड ऊसतोडणीची ही कडू कहाणी तृप्ततेचा ढेकर देणाऱ्या साधनसुविधासंपन्न शहरी व्यक्तीला विचार करायला लावणारी आहे.
अजून महाराष्ट्रातील 199 साखर कारखान्यातील लाखो मजुरांची मुले शिक्षणापासून वंचित आहेत. त्यांना प्रवाहात आणणे अजून कोसो दूर आहे, पण अशक्य मात्र नाही हे शिक्षण हमी प्रकल्पाने दाखवून दिलंय. याला वाचा फोडण्याचं काम ‘शिक्षणकोंडी’ पुस्तकाने केलंय. प्रकल्प यशस्वीतेची सचित्र माहिती टक्केवारीत दिलीय. ती आश्वासक तर आहेच. मात्र महाराष्ट्रातील इतर साखर कारखान्यांच्या परिसरात पुढील प्रकल्प राबविण्यासाठी उभारी देणारी आहे. तसेच पथदर्शक ठरणार आहे. संपूर्ण एकसंध समाज उन्नत होण्यास मदतगार ठरणार आहे.
शिक्षणकोंडी
संपादक : अनुजा जगताप
प्रकाशक : रोहन प्रकाशन
पृष्ठ : 108, मूल्य : रुपये 125/-





























































