
मुंबईत बस, लोकल तसेच अन्य ठिकाणाहून चोरलेले स्मार्ट मोबाईल वेगवेगळ्या टोळ्यांकडून ताब्यात घेणारा शहरातला मुख्य ‘कलेक्टर’ गुन्हे शाखेच्या हाती लागला आहे. चोरीचे मोबाईल बांगलादेश, नेपाळमध्ये नेऊन विकणाऱया त्या आरोपीसह त्याच्या अन्य तिघा साथीदारांना गुन्हे शाखा युनिट-6 च्या पथकाने दिल्लीत जाऊन पकडले आहे. आरोपींनी शिवाजीनगर येथील घरात साठा केलेला 248 मोबाईलचा साठा पोलिसांनी हस्तगत केला आहे.
मुंबईत सक्रिय असलेल्या मोबाईल चोरणाऱया टोळ्यांकडून चोरीचे स्मार्ट मोबाईल घेऊन ते मोबाईल बांगलादेश व नेपाळमध्ये विकणारा आणि त्या बदल्यात हवाला मार्फत पैसे घेणारा समीर शेख याने शिवाजीनगर येथील एका घरात चोरीच्या मोबाईलचा साठा करून ठेवला असल्याची माहिती युनिट-6 ला मिळाली. त्यानुसार प्रभारी निरीक्षक रवींद्र साळुंखे, निरीक्षक हनुमंत ननावरे, एपीआय चव्हाण, मीरा देशमुख, अर्चना कुदळे व पथकाने शिवाजीनगर येथील त्या घरावर छापा टाकला. त्यावेळी तेथे चोरीच्या मोबाईलचे घबाड सापडले. जवळपास 248 चोरीचे स्मार्ट फोन तेथे साठवून ठेवलेले होते. पोलिसांना आपल्या कारनाम्याची माहिती मिळाल्याची कुणकुण आधीच लागल्याने समीर शेख तसेच त्याचे साथीदार सन्नी यादव, मोसीन शेख, मोहम्मद वाजू शेख असे चौघे दिल्लीला पळून गेले होते, पण पोलिसांनी शिताफीने तपास करत दिल्लीत जाऊन या चौघांच्या मुसक्या आवळल्या. मोबाईल चोरणाऱया विविध टोळ्यांकडून ते मोबाईल जमा करण्याचे काम मोसीन, सन्नी, मोहम्मद हे करायचे. मग ते मोबाईल समीरकडे आणून दिले जायचे. त्यानंतर ते मोबाईल व्यवस्थित पॅकिंग करून एक्स्प्रेसने यूपी, बिहार, कोलकाता येथे नेऊन मग तेथून पुढे नेपाळ, बांगलादेशात पाठविण्याचे काम करायचा.
महिन्याला सहा ते सात लाख ‘प्रॉफिट’
समीर शेख हा शहरातील चोरीचे स्मार्ट मोबाईल कलेक्ट करणारा मुख्य बॉस आहे. समीर प्रत्यक्ष मोबाईल स्वीकारत नाही तर त्याच्या हाताखाली काम करणारे मालखाऊ मोबाईल जमा करतात. मग ते मोबाईल समीरकडे आणून देतात. महिन्याला चोरीचे 500 मोबाईल विकायचे त्याचे टार्गेट असते. तसेच महिन्याला सहा ते सात लाख रुपये समीरला मोबाईल विकून केवळ प्रॉफिट होते, असे उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले.






















































