
गेल्या तीन दिवसांपासून केरळमध्ये परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पुरामुळे अनेक घरे जमीनदोस्त झाली असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. तरीही चेंगन्नुर येथील आकाश आणि ऐश्वर्या या वधू-वराने हार मानली नाही. आपले लग्न ठरलेल्या मुहूर्तावरच पार पडावे यासाठी त्यांनी चक्क स्वयंपाकाच्या भांडय़ामध्ये बसून लग्न मंडपात एंट्री केली. एका मंदिरात विधीवत त्यांचा विवाह पार पडला. त्यांच्या या अनोख्या प्रवासाचे फोटो-व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. आम्हाला शुभकार्याला विलंब करायचा नव्हता. त्यामुळे आम्ही हा पर्याय निवडल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, केरळमध्ये अतिवृष्टीमुळे जीव गमावलेल्यांची संख्या 31 वर पोहोचली आहे. पूरग्रस्त भागात ऑरेंट अलर्ट जारी केला असून लष्कर आणि एनडीआरएफच्या पथकाकडून बचावकार्य सुरू आहे. अनेक वस्त्यांमधील लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
























































