
कोविडमुळे आर्थिक संकटात असलेल्या राज्यातील वाहतूकदारांच्या मागण्यांबाबत योग्य तो तोडगा लगेच काढला जाईल. वित्त व परिवहन विभागाच्या अधिकाऱयांना यासंदर्भात निर्देश देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली. राज्यातील शहरांमध्ये बसेस व ट्रक्स यांच्यासाठी पुरेशा प्रमाणात वाहनतळ उभारण्यासाठी नगरविकास विभागाला सूचना देण्यात येतील असे सांगतानाच, चेकपोस्टच्या ठिकाणी ट्रामा केअर सेंटर उभारण्यासंदर्भात नियोजन करण्याचे निर्देश उद्धव ठाकरे यांनी या वेळी दिले.
महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर्स, बस वाहतूक महासंघाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे आज भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेसुध्दा उपस्थित होते. वार्षिक मोटार वाहन करात सूट, व्यवसाय करात सूट, शाळा व धार्मिक स्थळांच्या प्रवासी वाहतूक करणाऱया वाहनांना मोटार कर माफी, राज्यभरात वाहने व बसेस थांबण्यासाठी पार्ंकग जागा, कामगार वाहतूक करणाऱया वातानुकूलित बसेसचा कर कमी करणे, जड व अवजड वाहनांना प्रमुख शहरांत 10 ते 16 तास करण्यात आलेली प्रवेश बंदी उठविणे, प्रलंबित वाहतूक केसेस रद्द कराव्यात, सार्वजनिक सेवा वाहनांच्या तपासणीचे पोलिसांचे अधिकार कमी करावेत अशा मागण्या यावेळी महासंघाने केल्या. त्या मागण्यांसंदर्भात योग्य तो तोडगा काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. या बैठकीस वाहतूक महासंघाचे अध्यक्ष प्रसन्न पटवर्धन, उपाध्यक्ष महेंद्र लुले, सरचिटणीस दयानंद नाटेकर उपस्थित होते.



























































