
महानिर्मितीसमोरील कोळसा टंचाईचे संकट आणखी गडद झाले आहे. वीज केंद्रांमध्ये आज केवळ अर्धा-पाऊण दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा आहे. त्यामुळे सध्या होत असलेल्या दैनंदिन कोळसा पुरवठा काही कारणास्तव खंड पडल्यास वीज निर्मिती करणे कठीण होणार आहे.
महानिर्मितीचे राज्यात सात औष्णिक वीज केंद्र असून येथून पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती करण्यासाठी दररोज सव्वा लाख मेट्रिक टन कोळशाची गरज आहे. तसेच वीज केंद्र सुरळीत चालू राहण्यासाठी किमान 22 दिवसांचा कोळशाचा साठा असणे अवश्यक आहे. मात्र महानिर्मितीकडे आज 1 लाख 38 हजार 245 मेट्रिक टन एवढा कोळसा आहे. परळी वीज केंद्रात दोन दिवसाचा, तर चंद्रपूर येथे दीड दिवसाचा कोळसा शिल्लक असून भुसावळ, खापरखेडा, कोराडी, पारस, नाशिक या वीज केंद्रांमध्ये केवळ अर्धा-पाऊण दिवस पुरेल एवढाच कोळसा आहे.



























































